Home आपला जिल्हा Breaking News मुल येथे पीजीडीएम- एबीएम व ग्रामीण व्यवस्थापन परीक्षेच्या तयारीकरिता मार्गदर्शनपर व्याख्यान

मुल येथे पीजीडीएम- एबीएम व ग्रामीण व्यवस्थापन परीक्षेच्या तयारीकरिता मार्गदर्शनपर व्याख्यान

47

कृषी महाविद्यालय, मुल येथे पीजीडीएम- एबीएम व ग्रामीण व्यवस्थापन परीक्षेच्या तयारीकरिता मार्गदर्शनपर व्याख्यान
मूल
२ जानेवारी, २०२६ कृषी महाविद्यालय, मुल येथील प्लेसमेंट सेल व स्पर्धा परीक्षा मंच अंतर्गत “पीजीडीएम-एबीएम व ग्रामीण व्यवस्थापन तसेच कृषि संलग्न करिअरच्या संधी व त्याबाबतची तयारी या विषयावर एक दिवसीय मार्गदर्शनपर अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे सदर कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालय, मुलचे माजी विद्यार्थी सोहम रागीट (मॅनेजमेंट ट्रेनी, कोरमंडल इंटरनॅशनल लिमिटेड) तसेच कुशल बाहेकर (ग्रो ट्रेनी, बीएएसएफ इंडिया) हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. व्याख्यान सत्राचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे यांनी भूषविले. उद्यानविद्या विभागाचे प्राध्यापक डॉ. आर. पी. गजभिये हे कार्यक्रमात उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. गितांशु डिंकवार, सहाय्यक प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र विभाग यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक सादर करत प्लेसमेंट सेल व कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या उपक्रमांच महत्त्व स्पष्ट केले.
सुरुवातीला सोहम रागीट यांनी आपल्या अनुभवाच्या आधारे ग्रामीण व्यवस्थापन, शाश्वत शेती, कृषी विस्तार सेवा आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधील करिअर संधींबाबत मार्गदर्शन केले. पीजीडीएम- ग्रामीण व्यवस्थापन अभ्यासक्रमांचे महत्त्व, प्रवेश प्रक्रिया, आवश्यक पात्रता, स्पर्धा परीक्षा तयारीची रणनीती तसेच व्यवस्थापन क्षेत्रातील विविध करिअर संधी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी विध्यार्थ्यांना परीक्षा पास केल्यानंतर मुलाखतीसाठी कशी तयारी करावी यावर सविस्तर माहिती दिली. कुशल बाहेकर यांनी अॅग्रीबिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील संधी, कॉर्पोरेट संस्कृती व आवश्यक कोशल्यांवर प्रकाश टाकला. कार्यक्रमादरम्यान त्यांनी पीजीडीएम-एबीएम (Post Graduate Diploma in Agri-Business Management) व कृषी क्षेत्रातील व्यवस्थापन शिक्षणामुळे बहुराष्ट्रीय कंपन्या, कृषी आधारित उद्योग, ग्रामीण विकास संस्था तसेच कॉर्पोरेट क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधींची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनात विध्यार्थ्यांनी परीक्षा देत असताना प्रश्नांची निवड अगदी अचूक करावी त्यामुळे वेळ वाचतो व प्रश्नसुद्धा सोडवला जातो. सध्यस्थितीत CAT परीक्षेच्या बाबतीत त्यांचे अनुभव कथन केले व सदर परीक्षेत यश संपादन केल्यास देशातील नामांकित व्यवस्थापन संस्थेत पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळविता येतो व चांगले पॅकेज प्राप्त करता येते. कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्नोत्तर सत्र घेण्यात आले. या सत्रात विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा, मुलाखत तयारी, करिअर नियोजन याबाबत विविध प्रश्न विचारले. वक्त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचे समाधानकारक निरसन केले. डॉ. आर. पी. गजभिये, प्राध्यापक, उद्यानविद्या यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेसाठी ध्येय निश्चित करताना स्वत:ची क्षमता, आर्थिक परिस्थिती व विध्यार्थ्याकडे उपलब्ध कालावधी या बाबींचा विचार करावा असे सांगितले. परीक्षेसाठी लागणारी पुस्तके, प्रश्नसंच, इ. गोळा करावे व परीक्षा जणू युद्ध आहे असे समजून जोमाने तयारीला लागावे. फळ पिकांमध्ये बहार येण्याकरिता ज्याप्रमाणे झाडांना स्ट्रेस दिला जातो त्याप्रमाणे विध्यार्थ्यानी सुद्धा नियोजन करून अभ्यासाला लागावे, विद्यार्थ्यांनी अविरतपणे कार्यतत्पर राहून ध्येयाप्रती सजग राहून त्यासाठी आवश्यक मेहनत घ्यावी, असा मौलिक सल्ला दिला. डॉ. व्ही. जी. अतकरे, सहयोगी अधिष्ठाता, कृषी महाविद्यालय, मुल यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या बदलत्या काळात कृषी शिक्षण केवळ उत्पादनापुरते मर्यादित न राहता व्यवस्थापन, विपणन व उद्योजकतेशी जोडले गेले आहे. कृषी पदवीधरांनी पारंपरिक नोकरीच्या चौकटीबाहेर विचार करून अॅग्रीबिझनेस मॅनेजमेंट, ग्रामीण व्यवस्थापन, कृषी उद्योग व स्टार्टअप्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये करिअर घडवावे, असे त्यांनी नमूद केले. पीजीडीएम-एबीएम व पीजीडीएम ग्रामीण व्यवस्थापन हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, व्यवस्थापन कौशल्ये तसेच व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करण्यास मदत करतात. विद्यार्थ्यांनी पदवी शिक्षण काळातच स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा व व्यक्तिमत्त्व विकासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. तसेच, माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन हे सध्याच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, असे प्रतिपादन त्यांनी केले. शेवटी त्यांनी प्लेसमेंट सेल व स्पर्धा परीक्षा मंचाद्वारे देण्यात येणाऱ्या या संधीचा पुरेपूर लाभ घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयातील सहाव्या सत्रातील विध्यार्थिनी कु. समृद्धी डडगेलवार हिने केले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. गितांशु डिंकवार यांनी उपस्थितांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली. या मार्गदर्शनपर व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना कृषी व्यवस्थापन क्षेत्रातील करिअरविषयी योग्य दिशा मिळाल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण सहभागीत्त्व आणि अतिथी वक्त्यांचे मार्गदर्शन यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी व उपयुक्त ठरला.