मूल : शिक्षण प्रसारक मंडळ, मूळ द्वारा संचलित व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित मूल येथील कर्मवीर महाविद्यालय, येथे ‘उच्च शिक्षणातील बदलते प्रवाह व जागतिक मानके’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न झाली. या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळ मूलचे अध्यक्ष अॅड. अनिल वैरागडे यांनी अध्यक्षीय स्थान भूषवले. परिषदेचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे प्र. कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांच्या हस्ते झाले. डॉ. श्रीराम कावळे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर सविस्तर असे मार्गदर्शन
केले. नवीन शैक्षणिक धोरण हे भारतीय संस्कृती, विविधता, परंपरा, व सर्व समावेशकता, भारतीय ज्ञान या घटकांना न्याय देणारे आहे असे मत व्यक्त केले. शिक्षण प्रसारक मंडळ मूळचे सचिव शशिकांत धर्माधिकारी यांनी नवीन शैक्षणिक धोरणातील लवचिकता या विषयावर मार्गदर्शन केले. उद्घाटन सत्रातील प्रास्ताविकात या परिषदेच्या मुख्य आयोजक व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनिता वाळके यांनी परिषद आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला. या परिषदेचे बीजभाषण डॉ. महेंद्र गोकुळा (जपान) यांनी केले. त्यांनी जपान व भारत या देशातील उच्चिशिषणातील साधर्म्य व फरक या विषयावर प्रकाश टाकला, त्यांच्या बीजभाषणात त्यांनी देशातील उच्चशिक्षणातील समस्या व त्यावरील उपाययोजना या विषयावर सविस्तर असे मार्गदर्शन केले. परिषदेच्या पहिल्या सत्राचे अध्यक्ष स्थान डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी भूषवले. या सत्रात डॉ. शामराव कोरेटी व डॉ. केशव वाळके यांनी मार्गदर्शन केले. डॉ कोरेटी यांनी उच्च शिक्षणातील मूल्य, नवे शैक्षणिक धोरण

त्यातील संधी व आव्हाने या विषयावर सविस्तर असे मार्गदर्शन केले. डॉ. केशव वाळके यांनी वेगवेगळ्या देशातील शैक्षणिक पद्धतीचा आलेख समजावून सांगितला. भूतान या देशाचे उदाहरण देऊन त्यांनी केलेली प्रगती यावर भाष्य केले. आपल्या देशातील संशोधनातील उदासीनता या विषयावर आपण आत्मचिंतन करायला पाहिजे असा प्रश्न उपस्थित केला. या सत्राचे अध्यक्ष डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी दोन्ही संसाधन मान्यवरांच्या विचारांचे सकारात्मक विवेचन करून आपल्या देशातील प्राचीन व आधुनिक शिक्षण प्रणालीवर तुलनात्मक भाष्य केले. परिषदेतील दुसऱ्या सत्राचे अध्यक्षस्थान डॉ. महेश जोशी यांनी भूषवले. व डॉ. विवेकानंद नरताम व डॉ. सतीश चापले संसाधन वक्ते म्हणून उपस्थितीत होते. डॉ. विवेकानंद नरताम यांनी विवेचनात भारतीय संशोधन संस्था, त्यांची कार्य, उच्च शिक्षणा तील बदलते प्रवाह, वेगवेगळ्या देशातील उच्च शिक्षणातील तुलनात्मक परिस्थिती इत्यादी पैलूंवर प्रकाश टाकला तर डॉ.
सतीश चापले यांनी मार्गदर्शनात नवीन शैक्षणिक धोरणात असलेल्या मूल्यांवर सविस्तर असे भाष्य केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. महेश जोशी यांनी दोन्ही संसाधन मान्यवरांच्या विचारांचा संक्षिप्त आढावा घेऊन कोणतीही नवीन गोष्ट स्वीकारताना अडचणींना सामोरे जावे लागते असे मत व्यक्त केले. ही परिषद यशस्वितेसाठी परिषदेच्या मुख्य आयोजक व प्राचार्या डॉ, अनिता वाळके, निमंत्रक प्रा. गजानन घुमडे, आयोजन सचिव डॉ. जी. एस. आगलावे, महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अक्षरा संशोधन पत्रिकेचे मुख्य संपादक डॉ. गिरीश कोळी यांनी परिश्रम घेतले. (ता. प्र. )






