Home आपला जिल्हा Breaking News उमेद अभियानाच्या प्रलंबित मागण्यासाठी नागपूर अधिवेशनात माहामोर्चा

उमेद अभियानाच्या प्रलंबित मागण्यासाठी नागपूर अधिवेशनात माहामोर्चा

81

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कार्यरत कॅडर व कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यासाठी राज्य संघटनेने कृती कार्यक्रम निश्चित केलेला असून त्याचाच एक भाग म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा संघटनेचे नेतृत्वात आमदार यांना कॅडर व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून निवेदन दिले. त्यावेळी आमदार मा. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी उमेदच्या मागणी रास्त असून त्या मार्गी लावण्याविषयी भूमिका घेण्याचे आश्वासित केले.
शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभाग अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान सन २०११ पासून कार्यरत आहे. त्याअंतर्गत गाव स्तरावर विविध समुदाय संसाधन व्यक्ती जसे की सीआरपी,कृषी सखी, पशु सखी, बँक सखी, सीटीसी इत्यादी कॅडर व प्रभाग, तालुका,जिल्हा,राज्य स्तरावर कंत्राटी तत्त्वावर कर्मचारी कार्यरत आहे. ग्रामीण भागात गरीब कुटुंबाच्या शाश्वत उपजीविकेसाठी काम करणाऱ्या कॅडर व कर्मचारी यांना सेवेची शाश्वती नाही. यासाठी गेल्या काही वर्षापासून उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून निवेदन,आंदोलन व मोर्चा काढलेला आहे परंतु मागण्या अजूनही प्रलंबित आहे.
ग्रामीण भागात कोणतेही कार्यक्रम व अभियान यशस्वी करायचे असेल तर उमेद अभियानाच्या महिला बचत गट व कॅडर, कर्मचारी अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असल्याची ओळख निर्माण झालेली आहे. लखपती दीदी सारखा उपक्रम उमेद अभियानाचा भाग आहे याबद्दल केंद्र व राज्य शासनाकडून ग्रामविकास विभागाला गौरविण्यात सुद्धा आलेले आहे. त्यामुळेच केंद्र शासनाने दखल घेऊन अभियानाचा कालावधी २०४७ पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र राज्य शासनाच्या ग्रामविकास विभाग उदासीन असून सन २०२६ नंतर अभियानाचे धोरण अजूनही जाहीर केलेले नाही. मार्च २०२६ नंतर सर्व कॅडर यांचे मानधन राज्य शासनाकडून न करता ग्रामसंघ ,प्रभाग संघाचे उत्पन्नातून करण्यात यावे असे परिपत्रक काढले आहे. आजच्या स्थितीला अभियानाच्या संस्थाकडून कॅडरचे मानधन करणे शक्य नाही. त्यामुळे कॅडर यांना मार्च २०२६ नंतर कॅडरचे काम व मानधनाबाबत चिंता निर्माण झाली आहे. कॅडर व कर्मचारी यांचे प्रश्नासाठी गेले वर्षभर ग्रामविकास मंत्री यांचे कडे पाठपुरावा केला परंतु अजूनही कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. याबाबतीत येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी शासन परिपत्रक निर्गमित झाले नाही तर राज्यभरातून सर्व कॅडर, महिला बचत गट,कर्मचारी मोठ्या संख्येने आंदोलन करणार आहे. याविषयीची पूर्व सूचना देण्यासाठी राज्यभर सर्व आमदार, खासदार, मंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे.
त्यावेळी संघटनेचे मार्गदर्शक प्रवीण भांडारकर, वसीम काझी, निलोफर शेख, कविता सुरमवार, रोशनी सोनुले, महिला तालुका संघटना पदाधिकारी, संदीप घोंगे, रोशन साखरे , जि.व्य. , नोविद भडके, नितीन वाघमारे, तालुका अभियान व्यवस्थापक , गजानन भिमटे, संतोष वाढई, पोंभुर्णा व मूल तालुक्यातील सर्व कार्यरत कॅडर व कर्मचारी, ग्रामसंघ व प्रभाग संघ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.