राज्य शासनाने विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांसाठी कोणत्याही जाचक अटी न ठेवता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करत सर्व महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. या योजनेमुळेच पुन्हा सत्ता स्थापितही करता आली. ही योजना प्रचंड लोकप्रिय ठरली. मात्र, यामध्ये काही त्रुटी समोर आल्यानंतर शासनाने यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. यासाठी शासनाने दोन महिन्यांची मुदत दिली असून ती मुदत १८ नोव्हेंबरला संपत आहे. पण सध्या लाडक्या बहिणीसाठी ई-केवायसी करण्याचा सर्व्हर बंद आहे. त्यामुळेच सध्या ई-केवायसी करण्यास अडचणी येत आहेत.
अनेक महिलांचे व पतीचे आधार कार्ड अपडेट नाही. आधारकार्डला मोबाइल नंबर लिंक नाही, अशा प्रकारच्या अडचणींचा महिलांना सामना करावा लागत आहे. बऱ्याच महिलांचे पती, वडील मयत झाले आहेत. तसेच घटस्फोटित महिलांनाही अडचणीचा सामना करावा लागत आहे. सध्या ई-केवायसी करण्याची मुदत संपत आल्यामुळे महिलांची लगबग सुरू झाली आहे पण सर्व्हर बंद असल्यामुळे महिलांमध्ये धास्ती वाढली आहे. रात्री बारानंतर सर्व्हर सुरू होत आहे.






