Home आपला जिल्हा Breaking News मूल नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी तसेच तहसीलदार मोरे यांची पत्रकार परिषद

मूल नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी तसेच तहसीलदार मोरे यांची पत्रकार परिषद

88

चंद्रपूर  जिल्ह्यातील मूल नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली. या परिषदेत निवडणुकीच्या तारखा, प्रक्रिया आणि आचारसंहितेबाबत माहिती देण्यात आली. संपूर्ण निवडणूक पारदर्शक व निष्पक्ष राहील, असे अधिकारी यांनी स्पष्ट केले.मूल नगरपरिषद निवडणूक संदर्भात मूल येथील निवडणूक निर्णय अधिकारी तसेच तहसीलदार मृदुला मोरे यांनी निवडणुकीच्या संदर्भात पत्रकारांशी हितगुज साधत सविस्तर माहिती दिली.
मूल नगरपरिषद क्षेत्रात नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी महिला आरक्षण असून याव्यतिरिक्त एकुण दहा प्रभागात २५४४९ इतकी लोकसंख्या असून त्यापैकी १०६३६ पुरुष, १११०८ महिला आणि अन्य एक असे एकूण २१७४५ नोंदणीकृत मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावू शकतील. मूल नगर परिषदेत या १० प्रभागातून २० नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. म्हणजेच एकंदरीत इथे महिला राज प्रस्थापित होणार आहे. ही नगरपरिषद निवडणूक २ डिसेंबरला होऊ घातली आहे.
त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १०नोव्हेंबर ते १७नोव्हेंबरपर्यंत सुरू असणार आहे तर १८तारखेला छाननी आणि छाननी नंतर लगेच उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
अपिल नसेल तेथे २१नोव्हेंबर रोजी पर्यंत नामांकन अर्ज परत घेता येणार असून अपिल असल्यास अपिलाच्या तारखेपासून तीन दिवसांत किंवा २५नोव्हेंबर पर्यंत प्रकरण निकाली काढण्यात येऊन अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २५नोव्हेंबर असून त्याच रोजी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर २६नोव्हेंबर रोजी चिन्ह वाटप करण्यात येणार असून इतर प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. एकंदरीत उमेदवारांना केवळ चार दिवस प्रचारासाठी मिळणार आहेत,तर प्रशासनाची ही यादरम्यान चांगलीच पळापळ होऊ शकते अशी शक्यता आहे ,मात्र यादृष्टीने निवडणूक आयोगाचे सुचनेनुसार सर्व प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
२ डिसेंबरला मूल नगरपरिषद च्या निवडणुकीसाठी मूल शहरात एकूण २४ मतदान केंद्रावर मतदान होणार असून या मतदान केंद्रांवर राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सर्व प्रकारच्या सोयी ठेवण्यात येतील असे त्यांनी यावेळी सांगितले. मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत राहील.
यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व मुख्याधिकारी संदीप दोडे ,अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नायब तहसीलदार प्रवीण चिडे तसेच पुरवठा निरीक्षक राजेश शिरभाते उपस्थित होते. मतमोजणी तहसील कार्यालय मूल येथे तीन डिसेंबर २०२५ ला सकाळी दहा वाजेपासून सुरू होईल असेही सांगण्यात आले.
वेळोवेळी अधिक माहिती आणि मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले.