Home आपला जिल्हा Breaking News मुल शहराला ग्रीन एनर्जी मॉडेल टाऊन म्हणून विकसित करण्याची मागणी”-शहराध्यक्ष आकाश येसनकर

मुल शहराला ग्रीन एनर्जी मॉडेल टाऊन म्हणून विकसित करण्याची मागणी”-शहराध्यक्ष आकाश येसनकर

64

शहराध्यक्ष आकाश येसनकर यांचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांना निवेदन सादर मुल शहराला ग्रीन एनर्जी मॉडेल टाऊन म्हणून विकसित करण्याची मागणी”

मुल : चंद्रपूर जिल्ह्यातील मुल शहराला “ग्रीन एनर्जी मॉडेल टाऊन” म्हणून विकसित करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे शहराध्यक्ष आकाश येसनकर यांनी राज्याचे राज्यमंत्री मा. इंद्रनील मनोहर नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात मुल शहरातील वाढता वीज वापर, वाढता शासकीय खर्च आणि पर्यावरणीय संतुलनाचा विचार करून शहराला शाश्वत व पर्यावरणपूरक ऊर्जेच्या दिशेने नेण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे.
उपजिल्हा रुग्णालय, मूल येथे दरमहा सुमारे अडीच लाख रुपयांपर्यंत वीज बिल भरावे लागते, ज्यामुळे शासकीय निधीवर मोठा भार येतो. जर रुग्णालयासह इतर शासकीय इमारतींवर सौर ऊर्जा प्रणाली (Solar Rooftop) बसविण्यात आल्या, तर रुग्णालय पूर्णपणे ऊर्जा-स्वावलंबी होऊन वार्षिक लाखो रुपयांची बचत होईल.

शहरातील चौक, बाजारपेठा, सार्वजनिक पार्क, तलाव व नदीकाठावर सौर उर्जेवर आधारित प्रकाशयोजना राबविल्यास शहर अधिक सुरक्षित, हरित आणि ऊर्जा-बचतीच्या दिशेने वाटचाल ठरेल.

तसेच शहरातील सुरक्षेसाठी सौर उर्जेवर चालणारे AI नियंत्रित CCTV कॅमेरे बसविण्याची मागणी करण्यात आली असून, हे कॅमेरे चेहरा ओळखणे, संशयास्पद हालचालींची नोंद घेणे आणि तत्काळ अलर्ट देण्यास सक्षम असतील. त्यामुळे मुल शहर स्मार्ट व डिजिटल सुरक्षा प्रणालीसह आधुनिक बनू शकेल.

या प्रकल्पामुळे स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीच्या नव्या संधी निर्माण होतील. सौर पॅनल बसविणे, देखभाल करणे आणि AI प्रणाली हाताळण्यासाठी स्थानिक आयटीआय तरुणांना व बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देऊन कामावर घेण्याचा प्रस्ताव आहे.

या उपक्रमामुळे मुल शहर ऊर्जा-बचत करणारे, पर्यावरणपूरक आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम शहर म्हणून विकसित होईल आणि “ग्रीन एनर्जी मॉडेल टाऊन” म्हणून आदर्श ठरेल, असा विश्वास शहराध्यक्ष आकाश येसनकर यांनी व्यक्त केला आहे.
निवेदन देताना रोजगार व स्वयंरोजगार शहर अध्यक्ष रजत कुकडे, राष्ट्रवादी तालुका युवक अध्यक्ष रोशन भेंडारे, शंकर पुरमशेट्टीवार , सोहेल भसारकर आदी उपस्थित होते.