१ ऑक्टोबर २०२५ रोजी शासन निर्णय (जीआर)



पुणे | पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाने (Pune District Retail Traders Association) गेल्या अनेक महिन्यांपासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. राज्यपाल व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार १ ऑक्टोबर २०२५ रोजी शासन निर्णय (जीआर) जारी झाला असून, त्यानुसार खाद्यपदार्थ विक्री करणारी दुकाने आता २४ तास सुरू ठेवता येणार आहेत.
मुंबई दुकाने व आस्थापना अधिनियम २०१७ नुसार, मद्य विक्री करणाऱ्या आस्थापनांना मात्र वेळेचे बंधन कायम राहणार आहे. मा. उच्च न्यायालयाने १ एप्रिल २०२५ रोजी दिलेल्या निकालात (Coram: G. S. Kulkarni आणि Advait Sethana) स्पष्ट केले होते की, २४x७ ही संकल्पना जागतिक स्तरावर स्वीकारली गेलेली आहे. यातून रोजगारनिर्मिती होते, राज्य सरकारचा महसूल वाढतो आणि ग्राहकांना सोयीसुविधा मिळतात.
तरीही पुणे व पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीत या निर्णयाचे पालन केले जात नसल्याची व्यापाऱ्यांकडून (Pune District Retail Traders Association) सातत्याने तक्रार होत होती. या संदर्भात पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ, कॅट महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने गृहमंत्रालय, राज्य सरकार तसेच पुणे आणि पीसीएमसी पोलिस आयुक्त यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.
या निर्णयामुळे छोटे हॉटेल्स, बेकरी, केक शॉप्स, आइसक्रीम पार्लर तसेच इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या निर्णयाचे स्वागत करताना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष व पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिनभाऊ निवंगुणे म्हणाले की, “२४x७ दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय हा व्यापाऱ्यांच्या दृष्टीने ऐतिहासिक आहे. यामुळे ग्राहकांच्या सोयीबरोबरच राज्याच्या महसुलात आणि रोजगार निर्मितीतही मोठी भर पडेल.”






