‘ हमारे मुठीमे है आकाश सारा ‘.. या
स्फूर्ती गीताने सर्वांचे डोळे पाणावले !
मूल/तालुका प्रतिनिधी
’ हमारे मुठीमे है आकाश सारा ‘.. ! या स्फूर्ती गीताने मातोश्री वृद्धाश्रमात वास्तव्य करणाऱ्या व्यक्तीचे डोळे पाणावल्याचे दिसुन आले. प्रसंग होता जनकल्याण सामाजिक संस्था मूल सदस्यांनी आपल्या परिवारासह मातोश्री वृद्धाश्रमाला रविवार दिनांक ८ मे ला भेट देऊन संवाद साधल्यानंतर त्यांच्यात नवी आशा निर्माण झाल्याचे दिसुन आले. संस्थेचे अध्यक्ष राजू गेडाम व सर्व सदस्यांनी स्वतः पुढाकार घेत सर्वांसोबत स्नेहभोजनासह विविध उपक्रम घेऊन त्यांच्या मनातील असलेल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
मातोश्री वृद्धाश्रम चंद्रपूर येथे जिल्ह्यातील अनेक कुटुंबातील व्यक्तींनी नाकारल्यांतर वृद्धांनी एक हक्काचे घर म्हणुन मातोश्री वृद्धाश्रमात आश्रय घेतला. माजी मंत्री शोभाताई फडणवीस या अध्यक्ष असुन सर्व सोयीयुक्त हे वृद्धाश्रम बनलेले आहे. या वृद्धाश्रमात एकुण ६४ व्यक्ती वास्तव्यात आहेत.
ज्या समाजात जन्म घेतला त्या समाजाचे काही देणं लागते या उद्देशाने वृद्धाश्रमात वास्तव्यात असलेल्या महिला व पुरुषांशी हितगुज करता यावे यासाठी जनकल्याण सामाजिक संस्था मूल ने ‘ एक दिवस वृद्धाश्रमात ‘ ही संकल्पना राबवित भेट दिली. संस्थेचे अध्यक्ष राजू गेडाम व सदस्यांनी सर्व वृद्ध व्यक्तीशी चर्चा केली. संवाद साधत सर्वांना बोलते केले. सर्वांना संस्थेच्या सर्व सदस्यांनी आपुलकीने जेवण वाढत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.वृद्धाश्रमातील परिसरात सर्वांना बसवत व प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले.
मातोश्री वृद्धाश्रम परिसरात सर्व सदस्यांनी गेल्या २२ वर्षांनंतर एकत्र आल्यानंतर आपले विचार मांडून पुढील दिशा ठरविण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी सर्वांनी पूर्वीच्या दिवसांची आठवण काढत पुन्हा तेच दिवस यावेत यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. भविष्यात सामाजिक बांधिलकी जपत विविध समाज हिताचे उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी महिला मंडळींनी खंबीरपणे पाठीशी उभे राहण्याची हिंमत दिली. त्यामुळे जनकल्याण सामाजिक संस्था मूल ची वाटचाल भविष्यात चांगली होईल अशा आशावाद व्यक्त करण्यात आला. संस्थेचे सदस्य रवि वाळके,बंडू अल्लीवर, अमोल वाळके, गुरुदास थेरकर,आशिष आकनुरवर, अमोल दुधे, सुहास गेडाम, शिवम गेडाम,मंगला राजू गेडाम, स्नेहा आशिष आकुलवार, प्रीती रवि वाळके, शीतल प्रशांत मेश्राम, अर्चना बंडू अल्लीवार, दिव्या अमोल वाळके, माधुरी गुरुदास थेरकर, दिक्षा सुहास गेडाम,धनश्री अमोल दुधे आदींनी सहभाग घेत सामाजिक बांधिलकी जोपासण्यात मदत केली.