पाणीटंचाईचे संकट@उमा नदी आटली, नळ योजना ठप्प

20

उमा नदी आटली, नळ योजना ठप्प, अनेक गावांवर तीव्र पाणीटंचाईचे संकट
 ग्रामीण भागातील नागरिकांसाठी जीवनदायिनी असलेल्या उमा नदीचे पात्र कोरडे झाले आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट ओढावले आहे. तालुक्यातील काही भागात नळ योजनाही बंद पडल्या आहेत. स्थानिक मूलमध्ये वाढीव पाणीपुरवठा योजनासुद्धा ऑक्सिजनवर सापडली आहे. त्यामुळे नागरिकांना कृत्रीम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
मूल येथून धावणाऱ्या उमा नदीचे पात्र पूर्णता कोरडे पडले आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. उमा नदीवर अवलंबून असलेल्या भादुर्णी, उसराळा, मोरवाही, मारोडा, कोसंबी, मरेगाव, डोंगरगाव, राजोली, भेजगाव, येसगाव, बोरचांदली, चांदली, चिमढा,
आकापूर येथे कृत्रीम पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गावात बोअरवेल आणि विहिरी असल्यातरी त्यांनीही तळ गाठला आहे. त्यामुळे गावातील हातपंपावर आणि विहिरींवर महिलांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे. गावातील आरओ मशीनसुद्धा
काही भागात बंद अवस्थेत आहे. त्यांची दुरूस्ती करण्याची साधी तसदीही प्रशासनाने घेतली नाही. उन्हाळ्यात दरवर्षीच मूल तालुक्यातील नागरिकांना कृत्रीम पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. तालुक्यातील भांदुर्णी येथील नळ योजना मागील कित्येक वर्षापासून बंद आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना हातपंप आणि विहिरींवर अवलंबून रहावे लागत आहे. गावात लावलेले आरओ मशीनसुदधा बंद असल्याने नागरिकांना क्षारयुक्त पाण्यावरच आपली तहान भागवावी लागत आहे. उमा नदीवर भादुर्णी येथे बंधारा बांधण्यात यावा, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.
तालुक्यातील चिरोली येथे जलजिवन मिशनचे काम अर्धवट अवस्थेत सापडले आहे. त्यामुळे येथे
पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. ‘ हर घर नल से जल’ या उद्देशाने जिल्हा परिषद चंद्रपूरच्या माध्यमातून ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत जलजीवन मिशनची मूल तालुक्यात २८ कामे मंजूर करण्यात आली. कंत्राटदाराने कामे सुरू केली. मात्र, अर्धवट कामामुळे येथे पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ऐन उन्हाळयात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने येथील महिलांमध्ये प्रशासनाविषयी असंतोष व्यक्त होत आहे. चिरोली येथील हातपंपसुद्धा बंद असल्याने पाण्यासाठी नागरिकांना धावाधाव करावी लागत आहे. येथील २४ गावातील ग्रीड पाणीपुरवठा योजना फक्त नावापुरतीच उरली आहे. तालुक्यातील टोलवाही येथेही पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
जनावरांच्या पिण्याच्यापाण्याचा प्रश्न
 भाजीपाला लागवडीसाठी आणि दुबार पिकासाठी शेतकऱ्यांना पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. वैनगंगा नदीवर अवलंबून असलेल्या
बऱ्याचशा ग्रामीण भागातील शासनाच्या नळ योजना बंद असल्याने पाणीटंचाईचे संकट कायम आहे. पिण्याच्या पाण्यासाठी क्षार युक्त पाणी वापरल्या जात असल्यानेनागरिकांना अनेक रोगांना सामोरे जावे लागत आहे.
नागरिकांनाच पिण्याचे पाणी मिळणे कठिण झाले असल्यानेपाळीव जनावरांना पाणीकुठून पाजायचे, असा प्रश्न
पशुमालकांना पडला आहे.