३०%महिला आरक्षणासाठी आवश्यक प्रमाणपत्र फक्त नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना दिनांक ११ते१४मार्चपर्यंत ग्राहक जागृती सप्ताहाची समाप्ती होईस्तोवर मोफत वाटप करण्यात येईल असे प्रमोद मशाखेत्री प्रेरणा आँनलाईन केंद्र संचालक यांनी जाहीर केले व या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
८मार्च जागतिक महिला दिन ते १५मार्च जागतिक ग्राहक दिनानिमित्त आयोजित ग्राहक जागृती सप्ताह अभियानांतर्गत दिनांक ११मार्च रोजी मूल येथील नवभारत कन्या विद्यालय व नवभारत विद्यालय मूल चे वतीने नवभारत कन्या विद्यालयाच्या प्रांगणात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल तालुका शाखा मूल चे अध्यक्ष दीपक देशपांडे व त्यांचे सहकारी , नवभारत विद्यालय मूल चे प्राचार्य अशोक झाडे, नवभारत कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अल्का राजमलवार,तसेच शिक्षक व शिक्षिका मंचावर विराजमान होते.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन ग्राहक गीत गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.अतिथींचे पुष्प व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
१५मार्च हा जागतिक ग्राहक दिन असतांनाच ८मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही ग्राहक जागृती सप्ताहाची सुरुवात केली कारण या दोन्ही दिवसांची सुरुवात ही एका विशिष्ट हेतूने प्रेरित होउन केली गेली होती आणि तो म्हणजे अधिकारांप्रती जागरुकता .
महिला चळवळ राबविताना लिंगभेद , वर्णभेद, मतदानाचा अधिकार आणि सामाजिक सुरक्षितता यासाठी लढा होता तर ग्राहक चळवळ राबविताना ग्राहकांची फसवणूक टाळणे व ग्राहकांच्या अधिकारांप्रती समाजात जनजागृतीचा प्रचार प्रसार करणे हा उद्देश होता.
परंतु या दोन चळवळी राबविताना आज केवळ महिलांच्या अधिकारांचीच चर्चा करुन चालणार नाही तर समाजात ग्राहक म्हणून वावरताना आपली पदोपदी फसवणूक होत असते आणि ही फसवणूक अशिक्षीत व्यक्तींची नाहीतर उच्चविद्याविभूषित व्यक्तींची ही कशी होते हे सोदाहरण स्पष्ट करताना शोषणमुक्त समाज निर्माण करण्यासाठी ग्राहक चळवळ समृद्ध करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आपल्याला ग्राहक संरक्षण अधिनियम १९८६अन्वये आणि सुधारीत २०१९च्या कायदयान्वये मिळालेल्या अधिकारांसाठी ग्राहक म्हणजे काय?हे पटवून देत , उद्या जर कोणत्याही प्रकारची फसवणूक झाली तर ग्राहक म्हणून महत्वाचा पुरावा म्हणून पावती मागण्याची सवय लावणे ,ती जपून ठेवणे गरजेचे आहे ,आणि विद्यार्थ्यांनी ही सवय लावण्यासाठी स्वतः सुरुवात केली आणि आपल्या कुटुंबियांना यांची माहिती देत त्यासाठी बाध्य केले तरीही आपण आपल्या कुटुंबाची फसवणूक टाळू शकतो असे मत दीपक देशपांडे,अध्यक्ष ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल तालुका शाखा मूल यांनी व्यक्त केले .
आज समाजात स्त्री शिक्षणाचे महत्व पटवून स्त्रियांना शिक्षणाच्या ओघात आणणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई आणि यांच्या कार्याची परिणिती म्हणून तुम्ही आम्ही हा दिवस बघू शकतो आहोत आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात उत्तुंग झेप घेत आहेत तर ग्राहक संरक्षण अधिनियम १९८६आणि नविन सुधारणांहह आलेला ग्राहक संरक्षण कायदा २०१९ आपल्याला ग्राहक म्हणूनजे अधिकार प्राप्त झालेले आहेत त्याविषयी अजूनही समाजात जागृतीचा अभाव आहे आणि म्हणूनच आपली फसवणूक व शोषण होत आहे ,अशा कार्यक्रमाचे माध्यमातून समाजात जनजागृतीचा प्रचार व प्रसार होत असतो म्हणून या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र च्या टीमचे करावे तेवढे कौतुक कमीच असल्याचे मत प्राचार्य अशोक झाडे यांनी व्यक्त केले.
महिलांना शिक्षणक्षेत्रात आणणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि आज सर्वच क्षेत्रात आपले प्रभूत्व सिद्ध करणाऱ्या महिलांच्या कार्याचे गुणगौरव करण्याचा प्रसंग आणि आपण ग्राहक म्हणून वेगवेगळ्या आमिषांना बळी पडत आपली फसवणूक टाळण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा आणि त्यातील तरतुदी आपल्याला जी संधी ग्राहक पंचायत महाराष्ट्र मूल तालुका शाखा मूलचे वतीने उपलब्ध झाली आहे , त्यामुळे या संधीचा फायदा घेऊन आपण आपली फसवणूक टाळण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन अल्का राजमलवार नवभारत कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापक यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय सिद्धावार यांनी तर प्रास्ताविक व या कार्यक्रमाचे आयोजनाचा उद्देश ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे रमेश डांगरे यांनी प्रतिपादन केला.,तर महिला दिनाचे औचित्य साधून शाळेतील सहायक शिक्षिका बेलसरे टीचर यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि आभारप्रदर्शन निमगडे सरांनी केले.
या कार्यक्रमाला ग्राहक पंचायत चे अध्यक्ष दीपक देशपांडे, तुळशीराम बांगरे, परशुराम शेंडे,रमेश डांगरे , मुक्तेश्वर खोब्रागडे,प्रमोद मशाखेत्री , शाळेतील शिक्षक, शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी ३०%महिला आरक्षणासाठी आवश्यक प्रमाणपत्र फक्त नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना दिनांक ११ते१४मार्चपर्यंत ग्राहक जागृती सप्ताहाची समाप्ती होईस्तोवर मोफत वाटप करण्यात येईल असे प्रमोद मशाखेत्री प्रेरणा आँनलाईन केंद्र संचालक यांनी जाहीर केले व या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले.