Home आपला जिल्हा Breaking News मूल तालुक्यात विनापरवाना वीटभट्टी सुरु करणाऱ्या कंत्राटदारांवर प्रशासनाची करडी नजर–डॉ. रवींद्र होळी,...

मूल तालुक्यात विनापरवाना वीटभट्टी सुरु करणाऱ्या कंत्राटदारांवर प्रशासनाची करडी नजर–डॉ. रवींद्र होळी, तहसीलदार, मूल

149

 परवाना न घेताच सुरू केली वीटभट्टी !  महसूल विभागाची कारवाई : कंत्राटदारांवर ठोठावला १५ लाखांचा दंड
मूल : वीटभट्टी सुरू करण्याचा परवाना नसतानादेखील कर वाचविण्यासाठी आडमार्गाने वीटभट्टी सुरू करून लाखो रुपये कमविण्याचा गोरखधंदा सुशी, दाबगाव व नलेश्वर येथे सुरू होता. महसूल प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकत विना परवाना वीटभट्टी सुरू केल्याने मूल महसूल प्रशासनाने संबंधित कंत्राटदारांवर १५ लाख ५५ हजार ४० रुपयांचा दंड ठोठावल्याने वीटभट्टी कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहे.
मूल तालुक्यात सन २०२३-२४ या वर्षात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, यशवंतराव चव्हाण विमुक्त जाती व भटक्या जमाती घरकुल योजना व महाराष्ट्र शासनाने नव्याने सुरू केलेली मोदी आवास योजनेचे जवळपास ३ ते ४ हजारांच्या आसपास घरकुल मंजूर आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात घरकुलांसाठी मातीपासून तयार केलेल्या विटांची मागणी वाढली आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा कर बुडवून जास्तीचा नफा कमावण्याच्या उद्देशाने वीटभट्टी कंत्राटदारांनी महसूल
प्रशासनाची परवानगी न घेताच वीटभट्टी सुरू केली. शासनाने निश्चित करून दिलेल्या नियमावलीला बगल देत सुशी येथील ३ दाबगाव २ व नलेश्वर येथील १ अशा सहा कंत्राटदारांनी वीटभट्टी सुरू केल्याने
मूलचे तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी दीपक उरकुडे व तलाठी झनक करे यांनी कारवाई करत १५ लाख ५५ हजार ४० रुपयांचा दंड ठोठावला आहे.
तालुक्यात विनापरवाना वीटभट्टी सुरु करणाऱ्या कंत्राटदारांवर प्रशासनाची करडी नजर असून तालुक्यात कुठेही विनापरवाना वीटभट्टी सुरु असल्याची माहिती असल्यास आम्हाला कळवावे. योग्य ती कारवाई करण्यात येईल.
-डॉ. रवींद्र होळी, तहसीलदार, मूल