मूलचा आपला दवाखाना डॉक्टरविना

77

मूल, ता. १ : राज्यातील महायुती सरकारने गाजावाजा करून सुरू केलेला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आता देखाव्याची वास्तू ठरले आहे. डॉक्टरविना आपला दवाखाना रुग्णांच्या ‘सेवेत’ आहे.
आपला दवाखान्यात एमबीबीएस दर्जाची वैद्यकीय अधिकारीचे पद मंजूर आहे. डॉ. कागदेलवार या आपल्या दवाखाण्यात सेवा देत होते. मात्र, १५ ऑक्टोबरपासून पुढील शिक्षणाकरिता त्यांनी सेवेतून राजीनामा दिला. तेव्हापासून अजूनपर्यंत पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे हा दवाखाना सध्या डॉक्टरविना सुरू आहे. या दवाखान्यात कर्मचारी येतात. मात्र, डॉक्टर नसल्याने येणारे रुग्ण आल्यापावली परत जात आहेत. शहरी भागातील गरीबांना मोफत आणि त्यांना उपलब्ध वेळेत उपचार घेता यावे यासाठी आपला दवाखाना सुरू करण्यात आला. मूल शहरातील या दवाखान्यात शंभरावर ओपीडीची नोंदणी होत आहे.
या दवाखान्याची आवश्यकता अधोरेखित झाली. मात्र, आरोग्य विभागाच्या दुर्लक्षतेमुळे आपला दवाखाना रुग्णांसाठी ‘परका’ झाला असल्याची टीका होत आहे. मूल शहरात एल्गार कार्यालयाच्या बाजूला एक मे २०२३ पासून आपला दवाखाना वाजतगाजत सुरू करण्यात आला. या दवाखाण्याचे उद्घाटन आनलाईन पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास मूल तालुक्यातील सर्व विभागाचे प्रमुख
अधिकाऱ्यांनीही उपस्थिती दर्शविली होती. त्यामुळे या दवाखान्यातील रिक्त पद तातडीने भरण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.