Ø 17 व 18 मार्च रोजी ऑरेंज तर 19 ते 21 मार्च दरम्यान येलो अलर्ट जारी
Ø नागरिक व शेतकऱ्यांना शासनाच्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि.17 : भारतीय हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्यात 17 ते 21 मार्च 2023 या कालावधीत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व जिल्ह्यातील एक दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, वादळ वारा (वेग 30 ते 40 कि.मी. प्रति तास) तसेच गारा पडण्याची शक्यता वर्तविली आहे. दि. 17 ते 18 मार्च 2023 या कालावधीकरीता ऑरेंज अलर्ट व दि. 19 ते 21 मार्च 2023 या कालावधीकरीता येलो अलर्ट जारी केला आहे.
नागरीकांनी विशेषतः शेतकऱ्यांनी पाऊस व गारपिटीचा अंदाज लक्षात घेता रब्बी हंगामातील परिपक्व अवस्थेतील हरभरा, गहू, मोहरी, जवस आदी पिकांची आवश्यक काळजी घ्यावी. वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक आहे. शेतात कामाला जात असताना अशा कालावधीमध्ये मोबाईल फोन सोबत बाळगू नये. वीजगर्जना सुरू असताना घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावी. पाऊस व वीज गर्जना होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये. शेतात काम करीत असताना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. जनावरांना मोकळ्या जागेत चारावयास सोडण्याचे टाळावे. तसेच गोठ्यामध्येच चारा व पाण्याची उपलब्धता करून द्यावी.
जिल्ह्यातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. शेतातील पिकांची, जनावरांची आवश्यक काळजी घ्यावी व स्वसंरक्षणासाठी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी केले आहे.