विद्यार्थ्यांची आधारकार्डवरील माहिती आणि स्टुडंट पोर्टलवरील माहिती यात विसंगती असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नोंद केलेले आधार अवैध ठरत आहे. जुलै 2022पासून वारंवार सूचना देऊनही आधारविषयक नोंद नसलेल्या विद्यार्थ्यांच्या पुढील 15 दिवसांत म्हणजेच 10 मार्चपर्यंत आधार नोंदी करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
तसेच ज्या विद्यार्थ्यांचा आधार आणि स्टुडंट पोर्टलवरील डेटा यात विसंगती आहेत, अशा विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये आवश्यक दुरुस्ती 28 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावी. जेणेकरून संच मान्यतेसाठी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची नोंद होईल, असेही शिक्षण विभागाने म्हटले आहे.
वर्ष 2022-23ची संच मान्यता आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येच्या आधारे करण्यात येणार आहे. त्यामुळे शाळेच्या स्टुडंट पोर्टल या लॉगिनवर विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणित करण्यासाठी काही सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शाळांना कार्यवाही करणे अपेक्षित आहे.
तसेच ज्या शाळा विद्यार्थ्यांची आधारविषयक नोंद करणार नाही, त्याबाबत शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची आधारविषयक नोंद का होत नाही, याची खात्री करावी असे आदेश शिक्षण आयुक्तालयाने दिले आहेत.






