वाघाच्या हल्यात गुराखी ठार हल्लेखोर वाघाचा बंदोबस्त करावा, ग्रामस्थांची मागणी

72

मूल : गांवालगतच्या जंगलात शेळ्या चारत असताना वाघाने हल्ला करून तालुक्यातील कांतापेठ येथील गुराखी देवराव लहानु सोपनकर (५५) याला ठार केल्याची घटना आज संध्याकाळी ५ वा. चे सुमारास उघडकीस आली.
मृतक देवराव सोपनकर नेहमी प्रमाणे गावा लगतच्या जंगलात शेळ्या चारावयास गेला होता. संध्याकाळ झाल्यानंतर चरावयास गेलेल्या शेळ्या घरी परत आल्या. परंतु शेळ्या चारावयास गेलेला देवराव माञ घरी परतला नाही. वडील देवराव परत न आल्याने ग्रामस्थांच्या सहकार्याने जंगलात शोध घेण्यात आला. तेव्हा गांवापासुन अंदाजे ४ कि.मी. अंतरावर चिरोली नियतक्षेञ नं. ७२० मध्ये देवराव रक्ताने माखलेल्या मृतावस्थेत आढळला. मृतावस्थेतील देवरावचे शरीर आणि परिस्थितीची पाहणी केली तेव्हा देवराववर वाघाने हल्ला करून दिड कि.मी. लांब फरफटत नेवुन ठार केल्याचे लक्षात आले. मृतक देवराव याचे पश्चात पत्नी आणि दोन मूल आहेत. सदर घटनेची माहीती वनविभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांना दिली. माहीती मिळताच चिचपल्ली वनपरीक्षेञ अधिकारी प्रियंका वेलमे आणि पोलीस अधिकारी सहका-यांसह घटनास्थळी पोहोचुन शासकीय सोपस्कर पुर्ण केले. दरम्यान परीसरात वाघांचा वावर वाढला असल्याने परीसरातील शेतकरी आणि नागरीकांना दहशती मध्ये जीवन जगावे लागत आहे. सदर घटनेच्या दोन महीण्यापुर्वी सुध्दा कांतापेठ परीसरात शेतात काम करणाऱ्या महीलेवर हल्ला करून तिचा बळी घेतला होता. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये वनविभागा विरूध्द संताप व्यक्त करण्यात येत आहे. हल्लेखोर वाघांचा तातडीने बंदोबस्त करावा. अशी मागणी कांतापेठ वासीयांनी केली आहे.