जिल्ह्यातील 1367 गावांची खरीप पिकांची पैसेवारी 50 पैसेपेक्षा जास्त Ø 419 गावे 50 पैसेवारीच्या खाली

97

चंद्रपूर, दि. 1 नोव्हेंबर : सन 2022-23 या वर्षाची खरीप पिकांची सुधारीत पैसेवारी जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 1367 गावांची खरीप पिकांची पैसेवारी 50 पेक्षा जास्त तर 419 गावांची पैसेवारी 50 पैसे पेक्षा कमी आहे. तसेच पीक नसलेल्या गावांची संख्या 47 आहे.

जिल्ह्यातील 15 तालुक्यात एकूण 1836 गावे आहेत. यापैकी खरीप पिकांच्या गावांची संख्या 1833 तर रब्बी पिकांच्या गावांची संख्या तीन आहे. जिल्ह्यात एकूण लागवडीखाली क्षेत्र 4 लक्ष 65 हजार 994 असनू प्रत्यक्षात पेरणी केलेले क्षेत्र 4 लक्ष 58 हजार 523 आहे. सन 2022-23 या वर्षाच्या खरीप पिकांची सुधारित पैसेवारीनुसार 50 पैसेवरील गावांची संख्या 1367 आहे. यात बल्लारपूर तालुक्यातील 32 गावे, राजुरा तालुक्यातील 110 गावे, कोरपना (113 गावे), जिवती (75 गावे), गोंडपिपरी (98 गावे), पोंभुर्णा (71 गावे), मूल (110 गावे), सावली (111 गावे), चिमूर (258 गावे), सिंदेवाही (114 गावे), ब्रम्हपुरी (137 गावे) आणि नागभीड तालुक्यातील 138 गावांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 50 पैसेपेक्षा खाली पैसेवारी असलेल्या गावांची संख्या 419 आहे. यात चंद्रपूर तालुक्यातील 87 गावे, वरोरा तालुक्यातील 183 गावे आणि भद्रावती तालुक्यातील 149 गावांचा समावेश आहे. तर पीक नसलेल्या गावांची संख्या 47 असून असून यात चंद्रपूर तालुक्यातील 16, राजूरा तालुक्यातील 1, जिवती तालुक्यातील 8, मूल 1, चिमूर 1, सिंदेवाही 1, ब्रम्हपुरी 3, वरोरा 2 आणि भद्रावती तालुक्यातील 14 गावे आहेत, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.