अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांकरिता मार्जिन मनी योजना Ø इच्छुक लाभार्थ्यांकडून प्रस्ताव आमंत्रित

25

चंद्रपूर,दि. 19 सप्टेंबर: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. 8 मार्च 2019 च्या शासन निर्णयान्वये केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरिता मार्जिन मनी योजना सुरू करण्यात आली आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजकांनी 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित 15 टक्के सबसिडी राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहे.

या योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णय क्रमांक स्टँडई-2020/प्र.क्र.23/अजाक, दि. 9 डिसेंबर 2020 अन्वये शासनस्तरावरून निश्चित करण्यात आल्या आहेत. सदरचा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे. सदर योजनेकरीता इच्छुक लाभार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे शासन निर्णयातील नमूद करण्यात आलेल्या सर्व अटी व शर्तींची पूर्तता करून प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले आहे.