महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 प्रोत्साहनपर लाभ योजनेसाठी शेतकऱ्यांनी आधार खाते लिंक करण्याचे आवाहन

24

चंद्रपूर, दि. 25 ऑगस्ट : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना – 2019 अंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयापर्यंत प्रोत्साहन पर लाभ देण्यास राज्य शासनाने 29 जुलैला मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत सन 2017 – 18, सन 2018 -19 आणि 2019 -20 या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेली असल्यास सदर शेतकरी योजनेस पात्र राहणार आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने व सहकार विभागाने योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे.

दरम्यान ज्या शेतकऱ्यांचे बँकेतील पीक कर्ज खाते आधार लिंक नसेल अशा शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रोत्साहनपर योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित बँकेच्या शाखेत जाऊन आपले खाते आधार लिंक करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन व सहकार विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

 या योजनेची अंमलबजावणी पूर्णत: ऑनलाइन पद्धतीने राबवली जाणार असून पात्र शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकनुसार 31 ऑगस्ट 2022 पर्यंत सर्व बँका या योजनेस पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार करणार आहे. तसेच सदर याद्या 1 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर 2022 या कालावधीत महाआयटीमार्फत विकसित संगणकीय प्रणालीवर अपलोड करावयाच्या आहेत. प्रोत्साहन प्रोत्साहनपर लाभ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणिकीकरणानंतर लाभार्थ्यांच्या बचत खात्यात लाभाची रक्कम थेट हस्तांतरित केली जाणार असल्याने, ज्या शेतकऱ्यांचे पीककर्ज खाते / बचत खाते आधार लिंक नसतील, अशा शेतकऱ्यांनी बँकेच्या शाखेत जाऊन आधार लिंक करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी केले आहे.