प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून ही महत्वाची काढली अट,अंतिम दिवस 31 जुलै 2022

22

सन 2022-23  या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री पीक विमा योजना (Pradhan Mantri Crop Insurance Scheme) राबविण्यात येत आहे. या योजनेत सहभाग घेण्यासाठी ई-पीक पाहणी नोंद सक्तीची नसल्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ई पीक पाहणी करण्यासाठी तलाठी कार्यालयाचे फेरे वाचणार असल्याने शेतकऱ्यांना पीक विमा योजनेसाठी अर्ज करताना काही गोष्टी सोप्या जाणार आहेत.

खरीप-2022 मध्ये या योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिवस 31 जुलै 2022 आहे. शासनाच्या ई-पीक पाहणीमध्ये पीक पेऱ्याची नोंद घेण्याची कार्यवाही 1 ऑगस्ट 2022 पासून सुरू होत आहे. पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठीही पीक पाहणीची नोंद आवश्यक असल्याबाबत काही ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.

पीक विमा योजनेत भाग घेत असताना काही वेळेस पिकाचा विमा काढलेले पीक व प्रत्यक्ष शेतात असलेले पीक यामध्ये तफावत आढळते. अशा परिस्थितीत शेतकरी  पीक विमा नुकसान भरपाईपासून वंचित राहतो. शेतकऱ्यांनी शेतात घेतलेले पीक व विमा हप्ता भरताना नोंदवलेले पीक यामध्ये काही तफावत आढळल्यास सदर शेतकऱ्याने पीक पाहणीमध्ये केलेली नोंदही अंतिम गृहित धरण्यात येईल असा निर्णय शासनाने घेतलेला आहे. 

त्यामुळे पीक विमा योजनेत सहभाग घेताना ई-पीक पाहणीमध्ये पिकाची नोंद असलेला दाखला असण्याची आवश्यकता नाही. सदर शेतकरी स्वयंघोषणापत्राद्वारे पीक विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो मात्र १ ऑगस्ट २०२२ नंतर त्यांनी ई-पीक पाहणीमध्ये आपल्या पिकांची नोंद करावी असे आवाहन आयुक्त धीरज कुमार यांनी केले आहे.

ई-पिक पाहणी ॲपवर शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नोंद केल्यास आपत्तीच्या काळात याचा अधिक फायदा होणार आहे. आपत्तीमुळे होणारे नुकसान याची आकडेवारी निश्चित करण्यास मदत होईल. यामुळे मदत देणे ही सोईचे होईल. तसेच शेतकऱ्यांना विमा, नुकसान भरपाई देणे शासनाला सोयीचे होईल.