जातीचा दाखला कसा काढतात? जाणून घ्या

71

शिक्षण, नोकरी वा अन्य शासकीय आरक्षणातील सवलतींचा लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला हा अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. महाराष्ट्रात एस.टी., एस.सी., एन.टी., एस.बी.सी., ओ.बी.सी. आणि इतर प्रवर्गासाठी जातीचा दाखला दिला जातो; पण कधी अमुक कागदपत्रे नाहीत म्हणून, तर कधी चुकीच्या ठिकाणी पाठपुरावा केल्यामुळे कित्येक जणांना शासकीय कार्यालयांचे उंबरे झिजवावे लागतात. अशा हेलपाठ्यांपासून वाचकांची मुक्तता करण्यासाठी हा विशेष लेख.

ऑनलाईन दाखला मिळविण्यासाठी

  • https://aaplesarkar.mahao nline.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या. तेथे नवीन यूजर या पयार्यावर क्लिक करून नोंदणी करावी लागेल.
  • नोंदणीनंतर मोबाईल क्रमांकावर आलेला यूजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग-इन करावे.
  • त्यानंतर नवीन पेज उघडेल. डाव्या बाजूला महसूल विभाग हा पर्याय निवडावा. पुढे उप-विभाग हा पर्याय दिसेल. त्यातील महसूल सेवा वर क्लिक करावे.
  • हा पर्याय निवडल्यानंतर त्याअंतर्गत उपलब्ध असलेल्या सेवांची यादी दिसेल. त्यातील जातीचे प्रमाणपत्र या पर्यायावर क्लिक करावे.
  • त्यानंतर आपोआप महाऑनलाईन विभागाचे संकेतस्थळ उघडेल. तेथे ‘जातीचे प्रमाणपत्र या पर्यायावर क्लिक करावे.
  • पुढील पेजमध्ये दिसणाऱ्या अर्जात दाखविल्याप्रमाणे माहिती भरावी. सर्व माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करावे.
  • त्यानंतर एक अर्ज क्रमांक दिला जाईल. पुढे फोटो आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत.

ही प्रक्रिया पार पाडल्यानंतर पैसे भरणे हा पर्याय दिसेल. तेथे ऑनलाईन पद्धतीने पैसे भरता येतात. पैसे भरल्यानंतरच अर्ज पडताळणीसाठी पाठविला जातो.

कोणती कागदपत्रे लागतात?

ओळखीचा पुरावा (किमान १) पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मनरेगा जॉब कार्ड, शासकीय किंवा निमशासकीय संस्थांनी जारी केलेले ओळखपत्र.

पत्त्याचा पुरावा (किमान १) पासपोर्ट, पाण्याचे बिल, रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, टेलिफोन बिल, वीज बिल, मालमत्ता कराची पावती

जातीचा दाखला कशासाठी लागतो?

सरकारी नोकरीत आरक्षण, शाळा-महाविद्यालयांत प्रवेश शुल्कामध्ये पूर्ण किंवा ठरावीक सूट, शैक्षणिक संस्थेत प्रवेश कोटा, सरकारी नोकरीच्या वयोमर्यादित अतिरिक्त सूट, शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी.

कुठे काढतात?

तालुका किंवा जिल्हा कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र विभागातील आपले सरकार सेवा केंद्र, ‘आपले सरकार संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने

किती पैसे लागतात?

₹३३.६०,   58-00 RS.

इतर कागदपत्रे

जात प्रमाणपत्रासाठी शपथपत्र, स्वतः अथवा जवळच्या नातेवाइकांच्या जातीचा पुरावा (अनुसूचित जाती आणि जमातीसाठी- १९५० पूर्वीचा, विशेष मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी १९६१ पूर्वीचा, इतर मागास वर्ग, मराठासाठी १९६७ पूर्वीचा)

विवाहित महिला असल्यास

विवाहापूर्वीच्या जातीचा पुरावा, विवाहाचा पुरावा- विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि • राजपत्रातील नाव बदलासंदर्भातील अधिसूचना, अर्जदाराने अन्य राज्य/जिल्ह्यामधून स्थलांतर केले असल्यास त्या राज्य/जिल्ह्यातील सक्षम प्राधिकाऱ्याने अर्जदाराच्या वडिलांच्या नावे जारी केलेले जात प्रमाणपत्र, धर्मांतर केले असल्यास त्यापूर्वीच्या जातीचा पुरावा.

दाखला मंजूर कोण करतात?

सर्वप्रथम अर्ज नायब तहसीलदारांच्या कार्यालयात जातो. तेथे अर्जाची पडताळणी करून तहसीलदारांकडे पाठविला जातो. तपासणी करून ते अर्ज उपविभागीय अधिकारी कार्यालयात पाठवतात. अर्ज उपविभागीय कार्यालयात आल्यास पडताळणी करून दाखला मंजूर केला जातो. त्रुटी असल्यास माघारी अर्जदाराकडे किंवा आपले सरकार सेवा केंद्राकडे पाठविला जातो. त्यानंतर संबंधित त्रुटी पूर्ण करून पुन्हा अर्ज पुढे पाठवता येतो.