Coronavirus In Maharashtra: कोरोनाचा विस्फोट, राज्यात नवी नियमावली जाहीर, असे आहेत नवे नियम, काय चालू आणि काय बंद घ्या जाणून

40

 

मुंबई – नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच वाढलेल्या कोरोनाच्या संसर्गाने राजधानी मुंबईसह संपूर्ण राज्यात भयावह रूप धारण केले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत २० हजारांहून अधिक तर महाराष्ट्रामध्ये ४० हजारांहून अधिक रुग्ण सापडू लागले आहेत.

त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीची अंमलबजावणी १० जानेवारीपासून होणार आहे. तसेस हे निर्बंध १५ फेब्रुवारीपर्यंत लागू राहतील, असे राज्य सरकारने जाही केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

नव्या नियमावलीनुसार राज्यात सकाळी ५ ते रात्री ११ पर्यंत जमावबंदी, रात्री ११ ते सकाळी ५ संचारबंदी लागू राहणार आहे. त्याबरोबरच सार्वजनिक प्रवासी वाहतुकीमधून प्रवास करण्यासाठी दोन डोस घेतलेले असणे अनिवार्य आहे.मात्र लोकल वाहतुकीवर कुठलेही निर्बंध लागू करण्यात आलेले नाही. तसेच राज्यातील शाळा आणि महाविद्यालये हे १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

असे आहेत कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात लागू केलेले नवे नियम
-राज्यात सकाळी ५ ते रात्री ११ पर्यंत जमावबंदी, रात्री ११ ते सकाळी ५ संचारबंदी
– शाळा महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद
– मैदाने, उद्याने, पर्यटनस्थळे पूर्णपणे बंद
– स्विमिंग पूल, जिम, स्पा पूर्णपणे बंद
– लोकल वाहतुकीवर कोणतेही निर्बंध नाहीत
– खासगी कार्यालयात २ डोस घेतलेल्यांनाच परवानगी
– २ डोस पूर्ण झालेल्यांनाच सार्वजनिक सेवेचा लाभ घेता येणार
– रेस्टॉरंट्स, नाट्यगृहे चित्रपटगृहे ५० टक्के क्षमतेनं रात्री १० पर्यंत सुरू
– लग्नाला ५० तर अंत्यविधीला २० जणांनाच परवानगी