चंद्रपूर, दि. 29 डिसेंबर : राज्यात दि. 27 व 28 डिसेंबर रोजी काही ठिकाणी गारपीट, अवेळी पाऊस यामुळे खरीप हंगामातील उभ्या असलेल्या तूर, कापूस तर काही प्रमाणात काढणी झालेल्या तुरीचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर रब्बी हंगामात विमा संरक्षित गहू, हरभरा, रब्बी ज्वारी यासारख्या पिकांचे देखील नुकसान झाले आहे. याबाबत अधिसूचित महसूल मंडळातील विमाधारक शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपनीस घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत नुकसानीबाबत सूचना देणे आवश्यक असल्यामुळे याबाबतची पूर्वसूचना आपल्या संबंधित विमा कंपन्यांना द्यावी.
शेतकऱ्यांनी नुकसानीबाबत सूचना देण्यासाठी क्रॉप इन्शुरन्स ॲप, विमा कंपनी टोल फ्री क्रमांक, विमा कंपनीचा ई-मेल, विमा कंपनीचे तालुकास्तरीय कार्यालय, कृषी विभागाचे मंडल कृषी अधिकारी कार्यालय तसेच ज्या बँकेत विमा जमा केला ती बँक शाखा आदी पर्यायांचा वापर करता येईल. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत आपल्या विमा संरक्षित पिकाचे नुकसान झाले असल्यास याबाबतची पूर्वसूचना आपल्या संबंधित विमा कंपनीकडे विहित कालमर्यादेत सादर करावी, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे.