राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निपटाऱ्यासाठी 10 हजारांपेक्षा जास्त केसेस

31

चंद्रपूर दि. 10 डिसेंबर : चंद्रपूर शहर तसेच जिल्ह्यामध्ये शनिवार दि. 11 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येत आहे. या लोक अदालतीत दाखल व दाखलपूर्व अशा 10 हजाराहून अधिक केसेस सामंजस्याने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येत आहे. तरी या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये विधिज्ञ, पक्षकार व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा कविता अग्रवाल यांनी केले आहे.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या सूचनेनुसार चंद्रपूर शहर व जिल्ह्यामध्ये सदर राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येत आहे.

झटपट निकाल हे लोक न्यायालयाचे वैशिष्ट्य आहे. लोक न्यायालयाचा महत्त्वाचा फायदा म्हणजे यामध्ये प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचा आपसी समझोत्याने व सर्व संमतीने त्वरित समक्ष निकाल केला जातो. त्या आदेशाला न्यायालयाच्या हुकूमनामा एवढेच महत्व असते व त्याची अंमलबजावणी सुद्धा करता येते. त्यामुळे वेळ, पैसा व श्रमाची बचत होते. वादांचा कायमचा सामोपचाराने निपटारा होतो. सर्वच पक्षांना जिंकल्याचे समाधान मिळत असल्याने भविष्यकालीन वाद टाळले जातात. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सहभागी होऊन आपले प्रकरण विहित सोप्या प्रक्रियेद्वारे निकाली करून घेऊन नमूद फायदे मिळविण्याची नामी संधी पक्षकारांना मोफत उपलब्ध झाली आहे, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व सर्व तालुका विधी सेवा समित्यांद्वारे करण्यात येत आहे.

चंद्रपूर जिल्हा मुख्यालयासह चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय न्यायालयामध्ये एकाच दिवशी घेण्यात येत असलेल्या या लोक अदालतीमध्ये न्यायालयातील दिवाणी, फौजदारी, कलम 138 एन.आय. अॅक्ट (धनादेश न वटणे-चेक बाउन्स) वित्त संस्था, बँकांची कर्ज वसुली प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, जमीन अधिग्रहण अर्ज, कामगार कायद्याखालील प्रकरणे, घरमालक-भाडेकरू वाद, कौटुंबिक वाद, इलेक्ट्रिसिटी अॅक्टचे समझोता योग्य वाद, वाहन हायर परचेस प्रकरणे, तसेच न्यायालयात येण्याअगोदरची (प्रिलिटिगेशन) प्रकरणे, पाणीपट्टी, वीजबिल आपसी समझोत्याकरीता ठेवण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी, तसेच ज्या नागरिकांना आपली प्रकरणे या लोक अदालतीमध्ये ठेवायची असतील, त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपुर येथे समक्ष येऊन किंवा 07172-271679 या हेल्पलाइन क्रमांकावर अथवा 8591903934 कार्यालयीन मोबाईल क्रमांकावर, तसेच कनिष्ठ लिपिक श्री. उराडे-9689120265, श्री. सोनकुसरे-9325318616, व श्री. रोघे-9552526912 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक यांनी कळविले आहे.