नगरपंचायत उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्रासाठी समितीकडे अर्ज केल्याबाबतचा पुरावा व हमीपत्र सादर करण्यास 8 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

58

चंद्रपूर दि. 7 डिसेंबर : राज्य निवडणूक आयोगाच्या 24 नोव्हेंबर 2021 रोजीच्या पत्रान्वये चंद्रपूर जिल्हयांतर्गत सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायती मधील सदस्य पदाच्या सार्वत्रिक तसेच नागभीड नगरपरिषदेमधील पोट निवडणुकीकरिता प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. सदर निवडणूक कार्यक्रमांमध्ये नामनिर्देशन पत्रासोबत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असल्याचे कळविले होते. परंतु, राज्य निवडणूक आयोगाच्या दि. 6 डिसेंबर 2021 रोजीच्या पत्रान्वये उक्त नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकीकरिता उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे दाखल करणे शक्य व्हावे, याहेतूने नामनिर्देशन पत्राचा कालावधी दि. 7 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाढविण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा पडताळणी समितीकडे अर्ज केला असल्याबाबतचा अन्य कोणताही पुरावा तसेच विहित नमुन्यातील हमीपत्र सादर करण्यास दि. 8 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.