जुन्या भांडणाचा राग, गोड बोलून मित्राला फिरायला बोलावलं, वेगवेगळ्या ठिकाणी दारु पाजली, नंतर मध्यरात्री काटा काढला

29

चंद्रपूर : चंद्रपूर शहरात दोन मित्रांनी मिळून तिसऱ्या एका मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी पूर्ववैमनस्यातून ही हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. विशेष म्हणजे हत्या करण्याआधी आरोपींनी मृतकाला प्रचंड दारु पाजली. त्यानंतर त्यांनी आधीचा भांडणाचा विषय काढत वाद घातला. वाद चिघडल्यानंतर आरोपींनी मित्रावर चाकूने वार करत हत्या केली. पोलीस या प्रकरणी आणखी तपास करत आहेत.

आरोपींनीच पोलिसांना फोन करुन हत्येची माहिती दिली

चंद्रपूर शहरातील म्हाडा कॉलनीच्या निर्जन भागात युवकाची हत्या झाल्याची घटना आज (11 सप्टेंबर) उजेडात आली आहे. तिरवंजा गावी राहणाऱ्या संकेत सुमटकर याची 2 मित्रांनी जुन्या वादातून हत्या केल्याचे तपासात उघड झालंय. शुभम साखरकर आणि संगम सागोरे या दोघांनी ही हत्या केल्याचे प्राथमिक पोलीस तपासात उघड झालं आहे. विशेष म्हणजे आरोपींनी स्वतः पोलिसांना फोन करुन या हत्येची माहिती दिली.

तीन मित्रांचं दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी मद्यप्राशन

या तिन मित्रांनी काल दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी मद्यप्राशन केले. आरोपींनी रात्री मृतकाला निर्जन जागी नेत आणखी दारु पाजली. त्याचवेळी जुना वाद उकरुन काढत वाद घातला. त्यानंतर चाकूने वार करत संकेतची हत्या केली. पोलिसांनी या हत्येचा उलगडा करण्यासाठी अधिक तपास सुरु केला आहे.

नाशिकमध्येही हत्येचा घटना

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये देखील एका हॉटेलात आचारीचं काम करणाऱ्या व्यक्ती हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. विशेष म्हणजे या हत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली होती. तरुण आरोपीने आपल्यापेक्षा वयाने मोठ्या, वडिलांच्या वयाच्या व्यक्तीला मारहाण करत त्यांच्या डोक्यात दगड घालून हत्या केली. संबंधित घटना ही मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास घडली आहे. ही संबंध घटना सीसीटीव्हीत अचूकपणे कैद झाली आहे. विशेष म्हणजे मध्यरात्री पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना रामसेतू पूल परिसरात संबंधित मृतदेह आढळला. त्यानंतर संबंध प्रकार उघडकीस आला.

हत्येचा थरार

या घटनेत हत्या झालेल्या व्यक्तीचं अनिल गायधनी असं नाव आहे. ते हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करायचे. विशेष म्हणजे तीन महिन्यांपूर्वीच त्यांनी हॉटेलमध्ये काम करायला सुरुवात केली होती. सर्व सुरुळीत सुरु होतं. पण अचानक आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांना त्यांचा मृतदेह दिसला.

पोलिसांनी तातडीने या घटनेची माहिती आपल्या सहकाऱ्यांना दिली. त्यानंतर इतर अधिकारी आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. हत्या झाली तेव्हा आजूबाजूच्या परिसरातील कुणी काही बघितलं का? मृतक व्यक्ती नेमकं कोण आहे? याची माहिती पोलिसांनी मिळवली.