सण आणि उत्सवाचे काळात कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करा-ठाणेदार राजपुत

25

कोरोना प्रादुर्भावाचा काळ अद्याप संपला नसुन नागरीकांच्या निष्काळजीपणामूळे त्याचा प्रादुर्भाव केव्हाही वाढू शकतो. त्यामूळे येणा-या पोळा, गणेशोत्सव, ईद आणि नवरात्रोत्सवाच्या काळात नागरीकांनी कोरोनापासुन सुरक्षीत राहण्यासाठी कोरोना प्रतिबंध संदर्भातील नियमांशिवाय कायदयाचे पालन करावे. अशी विनंती ठाणेदार सतिशसिंह राजपुत यांनी केली. पोलीस स्टेशन मूल च्या वतीने आयोजीत सार्वजनिक गणेश मंडळ, शांतता समिती आणि प्रतिष्ठीत नागरीकांच्या आयोजीत सभेत ठाणेदार राजपुत बोलत होते. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याचे समजून नागरीक कोणतीही भिती न बाळगता बिनधास्त वावरत आहेत. नागरीकांची ही कृती चुकीची असून कोणत्याही क्षणी कोरोनाचा शहर आणि तालुक्यात शिरकाव होण्यास वेळ लागणार नाही. त्यामूळे सणासुदीच्या काळात नागरीकांनी कोरोना प्रतिबंध संदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे, असे आवाहन करतांना ठाणेदार राजपुत यांनी येणा-या पोळा, गणेशोत्सव, ईद ए मिलाद आणि नवरात्रोत्सव साजरा करतांना पोलीस प्रशासन कायदयाचे कटाक्षाने पालन करणार असल्याने नागरीकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन केले.

यावेळी उपस्थित नगर परिषदेचे मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम आणि उपजिल्हा रूग्णालयाचे प्रभारी वैद्यकिय अधिक्षक डाॅ. उज्वल इंदुरकर यांनीही नागरीकांनी कोरोना संदर्भात गाफील न राहता माॅस्क आणि सॅनीटायझरचा नियमित वापर करावा, बाजारपेठ किंवा सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता सुरक्षीत अंतर ठेवावा. सार्वजनिक गणेश मंडळाच्या सदस्यांनी लसीकरणा सोबतचं रक्तदान आणि सामाजीक हिताचे उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. यावेळी ज्येष्ठ नागरीक डाॅ. राममोहन बोकारे आणि नगर सेवक अनिल साखरकर यांनी चर्चेत सहभाग घेतांना कोरोना प्रादुर्भाव थांबविण्यासाठी नागरीक प्रशासनाला सहकार्य करतील असा विश्वास देतांना गणेश विसर्जनाचे काळात पोलीस प्रशासनाने सार्वजनिक गणेश मंडळाला सहकार्य करावे. अशी अपेक्षा व्यक्त केली. सभेचे संचालन आणि आभार सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत ठवरे यांनी केले. सभेच्या यशस्वीतेसाठी उत्तम कुमरे, सुनिल घोडमारे, सचिन सायंकार, सुरेश खोब्रागडे आदिंनी परिश्रम घेतले. सभेला नगर परीषद उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, नगरसेवक मिलींद खोब्रागडे, प्रशांत लाडवे यांचेसह शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाचे आणि शांतता समितीचे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.