पोलीसांच्या डोळयात धुळ झोकुन अज्ञात चोरांनी शहरात धुमाकुळ माजवला आहे. मागील काही दिवसांपासून शहराच्या अनेक भागात चोरांनी हात साफ केल्याने नागरीकांमध्यें भितीचे वातावरण पसरले असून पोलीसांनी रात्रोची गस्त वाढवावी. अशी मागणी केल्या जात आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या काळात उद्भवलेली बेरोजगारी आणि आर्थिक समस्यांमूळे चोरीचे प्रमाण वाढेल अशी शक्यता वर्तविल्या जात असतांना महिण्याभरापासुन शहरात सुरू झालेल्या चोरीच्या घटनांनी नागरीकांनी चांगलाच धसका घेतला आहे. शहराच्या अनेक भागातील घरांमध्यें तर काही दुकानांमध्यें रात्रोचा अंधार आणि पोलीसांची गस्त होत नसल्याने तर काही घरांना कुलुम लागल्याची संधी साधून अज्ञात चोरांनी घरात प्रवेश करून आजपर्यत लाखोचा ऐवज लंपास केला आहे. होत असलेल्या चो-या भुरटया स्वरूपाच्या होत असून कधी सायकल तर कधी मोटार सायकल, कधी पेट्रोल तर कधी डिझेल, कधी दागीने तर कधी नगदी रूपये, नाहीच काही सापडले तर गायी, बक-या, आलमारीतील कपडे, मोटार पंप, मोठ्या वाहनामधुन जाँक व लोखंडी सामान चोरी जाण्याच्या किरकोळ घटना घडत असल्याने नागरीक पोलीसात तक्रार नोंदविण्याच्या भानगडीत पडतांना दिसत नाही. चोरीच्या लेखी तक्रारी होत नसल्याने शहरात सर्व काही आँल इज वेल समजून पोलीस प्रशासनाची नेहमीची गस्त नियमित सुरू आहे. पोलीस प्रशासनाची वाहनाद्वारे नेहमीची गस्त सुरू असली तरी पोलीसांच्या डोळयात धुळ झोकुन अनेक भुरटे चोर अनेकांच्या घरी, दुकानात व पानठेल्यावर हात साफ करीत आहेत. पोलीसांची गस्त सुरू असतांनाही चोरटे संधी साधून चोरी करीत असल्याने पोलीसांसमोर मोठे आव्हान ठरले आहे. काल राजोली येथे दोन दुचाकी चोरीस गेल्या तर काही दिवसांपूर्वी मुख्य मार्गावरून उभा ट्रक आणि घरासमोर उभी असलेली होंडा शाईन दिवासाढवळ्या चोरटयांनी पळवुन नेली. चार दिवसांपूर्वी शहराच्या वार्ड नं. १६ मधून सायकल तर आठवडयाभरापूर्वी दरवाजा फोडून घरात ठेवलेले ३५ हजार रूपये लंपास केले. या सर्व चोरीच्या घटनांमूळे पोलीसांची नियमित गस्त होत असली तरी पाहिजे त्या प्रमाणांत गस्त होत नसल्याची नागरीकांची ओरड आहे. गस्त घालण्याच्या नांवाखाली कर्तव्यावरील पोलीस पोलीस वाहनाने तर कधी दुचाकीने शहराच्या मुख्य भागात शिट्टया मारत गस्त घालत असले तरी शहराच्या अनेक भागात गस्तीवरील पोलीस कर्मचारी पोहचत नसल्याची नागरीकांची ओरड आहे. त्यामूळे होत असलेल्या भुरटया चो-यांवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने नेहमीच्या गस्ती मध्यें बदल करून गस्त घालणा-या पोलीस कर्मचा-यांच्या संख्येत वाढ करून गस्तीच्या पध्दतीत बदल करावा. अशी मागणी नागरीकांमधून होत आहे.