ग्रामीण भागातील 322 गावांनी कोरोनाला रोखले Ø जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला टास्क फोर्सचा आढावा

38

चंद्रपूर, दि.26 जुलै : गत दीड वर्षांपासून कोरोना विषाणुने मानवी जीवन व्यापले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही पहिल्या आणि दुस-या लाटेत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळला. मात्र असे असले तरी जिल्ह्यातील तब्बल 322 गावे अशी आहेत, ज्यात सुरवातीपासून ते आजपर्यंत (मार्च 2020 ते जुलै 2021) एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नसून या गावांनी गावाच्या सिमेवरच कोरोनाला रोखून धरले. तर सद्यस्थितीत जिल्ह्यातील जवळपास 1200 गावांत गत एक महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्ण आढळला नसल्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आयोजित टास्क फोर्सच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा आयुक्त राजेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, पोलिस उपअधिक्षक शेखर देशमुख, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश टेकाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुंवर, जिल्हा पुरवठा अधिकारी शालिग्राम भराडी, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. खंडाते आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात ग्रामीण भागात अंदाजे 1600 गावे आहेत. यापैकी तब्बल 75 टक्के म्हणजे 1200 गावात गत एक महिन्यापासून कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. तर गत दीड वर्षात सुरवातीपासून ते आतापर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नसलेल्या गावांची संख्या 322 आहे. यात जिवती तालुक्यातील सर्वाधिक 98 गावे, बल्लारपूर तालुक्यातील 9 गावे, भद्रावती 12, चंद्रपूर 12, मुल 11, नागभीड 12, राजूरा 36, सिंदेवाही 27, वरोरा 11, पोंभुर्णा 9, कोरपना 25, ब्रम्हपूरी 13, चिमुर 22, गोंडपिपरी 17 आणि सावली तालुक्यातील 8 गावांचा समावेश आहे.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, जगातील काही देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे गाफिल राहू नका. संभाव्य तिस-या लाटेसंदर्भात सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे लोकांचा कल मास्क न वापरण्याकडे दिसत आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी ‘नो मास्क नो एन्ट्री’ ची कडक अंमलबजावणी करावी. शहरी व ग्रामीण भागात दुकानांच्या वेळा ठरवून दिल्यानंतरही त्याचे उल्लंघन होत असल्यास त्वरीत कार्यवाही करा. चार वाजेनंतर संबंधित आस्थापने बंद झाली पाहिजे. त्यासाठी महानगर पालिका, नगर पालिका आणि तालुका प्रशासनाने आपापल्या टीम पुन्हा सक्रीय कराव्यात, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.
नुकसान भरपाईचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश : जिल्ह्यात 23 व 24 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीने शेतमालाचे नुकसान झाले असल्यास त्वरीत पंचनामा करावा. तसेच प्रशासनाकडे अहवाल सादर करून अनुदानाची मागणी करावी, अशा सुचना त्यांनी यंत्रणेला दिल्या. पीक विमा योजनेला 31 जुलैपर्यंत मुदवाढ मिळाली आहे. 23 जुलैच्या अतिवृष्टीत ज्या शेतक-यांचे नुकसान झाले असेल त्यांनी 72 तासांमध्ये सदर माहिती कळवावी, असेही आवाहन त्यांनी केले.
बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, न.प. मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.