1 ऑक्टोबरपासून कॉलेज सुरू होणार, ‘यूजीसी’च्या गाइडलाइन्स जाहीर

25

देशातील महाविद्यालये 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांना प्रवेश प्रक्रिया आणि प्रवेशांसंदर्भात गाइडलाइन्स दिल्या आहेत. त्यानुसार 2021-22 या शैक्षणिक वर्षाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रिया 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

‘यूजीसी’चे सचिव रजनीश जैन यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन बनवलेल्या या गाइडलाइन्स सर्व विद्यापीठांचे कुलगुरू आणि महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पाठवल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे आहेत.

 प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रिया 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण कराव्यात. रिक्त जागांवरील प्रवेश पूर्ण करण्याचा शेवटचा दिनांक 31 ऑक्टोबर असेल. परीक्षांसाठी आवश्यक कागदपत्रेही 31 डिसेंबरपर्यंत घेण्यात यावीत.
 प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे प्रथम सत्र 1 ऑक्टोबरपासून सुरू करावे.
 चालू 2020-21 शैक्षणिक वर्षातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा ऑफलाइन/ऑनलाइन किंवा दोन्ही पद्धतीने 31 ऑगस्टपर्यंत कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करून घ्याव्यात.
 बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या निकालांना विलंब झाल्यास शैक्षणिक सत्र 18 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे नियोजन करावे.
 लॉकडाऊन आणि संबंधित कारणास्तव पालकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्या परिस्थितीत त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द केले किंवा अन्यत्र स्थलांतर केले तर त्यांची भरलेली फी परत करण्याची कार्यवाही 31 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी.

कोरोनाची साथ सुरू असल्याने विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी जाहीर केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करून अभ्यासक्रमांचे वर्ग १ ऑक्टोबरपासून सुरू करावेत, असे आदेश यूजीसीने विद्यापीठे, महाविद्यालयांना दिले आहेत. या शैक्षणिक वर्षासाठीचे वेळापत्रकही जाहीर केले. यूजीसीने म्हटले आहे की, नवे शैक्षणिक वर्ष लवकर सुरू करण्यास विद्यापीठ, महाविद्यालयांनी प्रयत्न करावा. कोरोना स्थितीचा विचार करून त्या परिसरातील विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन की ऑफलाइन शिक्षण द्यायचे याचा निर्णय घ्यायचा आहे. काही विद्यापीठांनी अद्याप २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांच्या परीक्षा घेतलेल्या नाहीत. या परीक्षा घेणे सर्व महाविद्यालये, विद्यापीठांना बंधनकारक आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात अंतिम सहामाही परीक्षा किंवा अंतिम वर्षांची परीक्षा या लेखी किंवा ऑनलाइन पद्धतीने येत्या ३१ ऑगस्टपूर्वी घ्याव्यात.

मास्क घालणे गरजेचे

कोरोना साथीचा आणखी फैलाव होऊ नये म्हणून केंद्र व विविध राज्य सरकारांनी काही उपाययोजना केल्या आहेत. देशात लसीकरण सुरू असले तरी लोकांनी मास्क घालणे, शारीरिक अंतर राखणे आवश्यक आहे. त्या नियमांचे पालन करूनच विविध विद्यापीठे, महाविद्यालयांनी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करावे, असेही यूजीसीने एका निवेदनात म्हटले आहे.