चंद्रपूर : विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घरात लावलेल्या जनरेटरमुळे घरातील 6 जण मरण पावल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. विशेष म्हणजे मृतांमध्ये नवरदेव-नवरीचा समावेश आहे. या घटनेमुळे नवदाम्पत्याचं सुखी संसाराचं स्वप्न धुळीस मिळालं आहे. चंद्रपूर शहरालगत दुर्गापूर भागात ही धक्कादायक घटना घडली.
सविस्तर माहिती अशी की, रात्री वीज गेल्यावर घरात या कुटूंबाने डिझेल जनरेटर संच लावला होता. मात्र जनरेटरमधून बाहेर येणारा धूर घराबाहेर जाण्यास मार्ग नव्हता. त्यामुळे रात्रभर धुराचे लोळ घरातच घुटमळत होते. घर पॅक असल्यामुळे धूर बाहेर जायला वाव नव्हता. त्यामुळे झोपेत असलेल्या लष्करे कुटुंबांचा श्वास कधी गुदमरल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या घटनेत मजूर असलेल्या एकाच कुटुंबातील 7 पैकी 6 जणांचा मृत्यू झाल्याने पंचक्रोशी सैरभैर झाली आहे. मृतांमध्ये अजय लष्करे आणि माधुरी लष्करे या नवदाम्पत्याचा समावेश आहे. हे नवदाम्पत्य नुकतचं देवदर्शन करुन आलं होतं. गेल्या महिन्यात 28 जून रोजी त्यांच लग्न झालं होत.
मृतांमध्ये रमेश लष्करे- 44, अजय लष्करे-20 लखन लष्करे 9, कृष्णा लष्करे आठ, माधुरी लष्करे 18, पूजा लष्करे 14 अशी मृतांची नावे आहेत. दासू लष्करे 40 हा एकमेव सदस्य बचावला आहे.
दरम्यान सर्व मृत्यू विषाने झाल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे. शवविच्छेदनानंतर याचा खुलासा होणार आहे. तर घरातून जनरेटरचा धुर बाहेर जाण्यास मार्ग नसल्याने या धुरामुळेच मृत्यू झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.