सापाने गिळले कोंबडीचे दहा अंडे मूल तालुक्यातील लहान कोसंबी येथील घटना

29

मूल  :— मूलपासून जवळच असलेल्या लहान कोसंबी येथे एका विषारी सापाने कोंबडीचे चक्क दहा अंडे गिळले. ही घटना रविवार ता 27 जून रात्री साडेआठ वाजताच्या दरम्यान घडली. पकडण्यात आलेल्या सापाला मारोडा जंगलात सुखरूप सोडण्यात आले.
मूल पासून सहा किमी अंतरावर असलेल्या लहान कोसंबी येथील पवन लोनबले यांच्या घरात रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास विषारी सापाने प्रवेश केला. घराच्या एका कोप—यात पिल्ले फोडण्यासाठी मोठया टोपलीत कोंबडी अंडयावर बसली होती. सापाने थेट कोंबडीच्या दिशेने आपला मोर्चा वळविला. सापाला पाहताच कोंबडी भीतीने पळाली.
कोंबडीचा फडफडण्याचा आवाज ऐकूण लोनबले कुटुंबीयांनी धाव घेतली. तेव्हा त्यांना चक्क सापाचे दर्शन झाले. त्यांनी लागलीच मूल येथील सर्पमित्र उमेश झिरे आणि तन्मय झिरे यांना माहिती दिली. सर्पमित्र येईपर्यंत
सापाने कोंबडीच्या अकरापैकी दहा अंडयांवर ताव मारलेला होता.
तत्काळ दाखल झालेल्या तन्मय झिरे यांनी दहा अंडे गिळलेल्या आणि कोंबडीच्या शिकारीत बसलेल्या सापाला अलगद पकडले. त्यानंतर सापाने गिळलेले दहा अंडे क्षणार्धात तोंडावाटे बाहेर ओकले.
पावसाळी वातावरणामुळे सापाने घरात प्रवेश केला आणि अंडयावर ताव मारला. अंडयाची नासाडी झाली असली,तरी लोनबले यांची कोंबडी मात्र बचावली. सापाला पकडण्यात आल्याने लोनबले कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडल. यावेळी परिसरातील नागरिकांनी घटना पाहण्यासाठी गर्दी केली होती. पकडण्यात आलेला साप साडेपाच फुटाचा होता. सापाची नोंद करून सर्पमित्र तन्मय झिरे यांनी सापाला मारोडा जंगलात सुखरूप सोडले.