मागील कित्येक वर्षापासून आदिवासी व इतर पारंपारिक वननिवासी जबरानजोत शेतकरी शेती करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. अशा जबरानजोत शेतकऱ्यांना शेती पासून वंचित करण्याचे कट-कारस्थान वनविभागाचे अधिकारी गुरुप्रसाद आणि वन अधिकारी करत आहेत असा आरोप राजू झोडे यांनी केला.
मूल तालुक्यातील पारंपारिक आदिवासी व गैर आदिवासी शेतकरी यांना वनअधिकारी शेती करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. सदर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे दावे टाकले असताना व ते प्रलंबित असताना वनाधिकाऱ्यांना शेती करण्यापासून रोखण्याचा अधिकार नाही. वन हक्क कायद्यानुसार जिल्हाधिकारी व तहसीलदार हे वनहक्क समितीचे प्रमुख असतात. जर त्यांच्या आदेशाचे पालन वनअधिकारी करत नसतील तर जबरान जोत शेतकऱ्यांना घेऊन कायदा स्वतः हातात घेणार असा इशारा राजू झोडे यांनी माननीय तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला. शेतीचे हंगाम सुरू झाले असताना जाणीवपूर्वक वन अधिकारी शेतकऱ्यांना शेतीपासून रोखतात व त्यांना धमक्या देतात. ही बाब अतिशय निंदनीय असून जगाचा पोशिंदा शेतकरी यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम वनविभागाचे अधिकारी करत आहेत.
आज मूल तालुक्यातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन राजू झोडे यांनी तहसीलदार यांच्याशी चर्चा केली व सदर शेतीचे दावे प्रलंबित असताना वनाधिकार्यांनी शेतकऱ्यांना शेती करण्यापासून रोखू नये असा तात्काळ आदेश काढावा अशी मागणी केली. वन विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांना जर शेती करण्यापासून रोखत असतील तर स्वतः कायदा हातात घेणार व आपल्या पद्धतीने शेतकर्यांना सोबत घेऊन उत्तर देणार अशी तंबी वन प्रशासनाला राजु झोडे यांनी दिली.
जबरान जोत शेतकऱ्यांनी राजू झोडे यांच्या नेतृत्वात तहसीलदार मूल यांना निवेदन दिले. शेतकऱ्यांना प्रशासनाने तात्काळ न्याय दिला नाही तर जबरानजोत शेतकर्यांच्या सर्व कुटुंबांना घेऊन तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असा इशारा राजु झोडे यांनी प्रशासनाला दिला.