कष्टकरी, हात मेहनतीचे काम करणाऱ्यांसाठी वडेट्टीवार सरसावले, समाजसेवकाच्या भूमिकेत दिसले

23

चंद्रपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता यावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाने राज्यात लॉकडॉऊन लागू केला आहे. यामुळे कष्टकरी व हातावर काम करणाऱ्यांचे रोजगार बुडले आहेत. यामुळे पालकमंत्री विजय वडेट्टीवार व विजयभाऊ वडेट्टीवार मित्र परिवाराने, ब्रम्हपुरी मतदार संघातील ब्रम्हपुरी, सावली व सिंदेवाही तालुक्यातील कष्टकरी व हातमजुरी काम करणाऱ्या सलूनवाले, चहा टपरीवाले, घरकाम करणारे, रिक्शाचालक, डफरे वाजविणारे समाज बांधव आदी कष्टकऱ्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी एक हजार रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला. याला गुरुवारी ब्रम्हपुरी येथून सुरूवात करण्यात आली. यावेळी वडेट्टीवार यांच्या हस्ते ब्रम्हपुरी तालुक्यातील 200 लोकांना प्रत्येकी एक हजार रुपयांचे वाटप करण्यात आले. (Chandrapur guardian minister Vijay Wadettiwar seen in the role of social worker)

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे बघून यावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाने राज्यात लॉकडॉऊन लागू केला. त्यामुळे कष्टकरी व हातावर काम करणारे रिक्षा चालक, सलूनवाले, रस्तावर चहा विकणारे, पान टपरी वाले, घरकाम करणाऱ्यासह कष्टकरी व हातावर काम करणाऱ्याचे रोजगार बुडले. यामुळे त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, सतत जनतेच्या संपर्कात असलेले आणि भाऊ म्हणून मदतीसाठी धावून जाणारे जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा आपल्यातील समाजसेवकाचा परिचय दिला.

माझ्या दरवाज्यात येणारा दुःखी माणूस नेहमी हसत जावा, हे त्यांचे ब्रीद वाक्य. माझ्याकडे जे काही आहे ते समाजासाठी आहे. याच उदात्त भावनेने कुठेही संकट आले, की मदतीसाठी धावून जाणे हा वडेट्टीवार यांचा स्थायी स्वभाव आहे. याच पद्धतीने, त्यांनी मदतीचा उपक्रम सुरू केला. जे देतात ते स्वतःकडून देतात हे विशेष.

यावेळी, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष खेमराज तिडके, नगर परिषद बांधकाम सभापती विलास विखार, शहर काँग्रेस अध्यक्ष हितेंद्र राऊत, नगरसेवक नितीन राऊत, मुन्ना राऊत, यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.