मूल येथील राइस मिल असोसिएशनने प्रशासनाला सहकार्याचा हात

42

मूल : तालुक्यातील कोरोनाग्रस्तांना संस्थात्मक अलगीकरणात उपचार घेणे सोयीचे व्हावे म्हणून येथील राइस मिल असोसिएशनने प्रशासनाला सहकार्याचा हात दिला आहे. कोरोना बाधितांच्या विश्रांतीकरिता असोशिएशनच्या वतीने ५० पलंग, गादी, चादर, उशी व सरकारी दवाखान्यात बाधितांना व नातेवाईकांना बसण्यासाठी बेंचची व्यवस्था यापूर्वीच केली आहे. पुन्हा नव्याने ५० बेड राइस मिल असोसिएशनने उपलब्ध करून दिले आहे.

तालुक्यात कोरोना बाधितांचा वाढता आकडा लक्षात घेऊन प्रशासनाने संस्थात्मक कोरोना केअर सेंटर मध्ये खाटांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने घेतलेल्या वाढीव खाटांच्या निर्णयाला राइस मिल असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून पुन्हा सहकार्यांचा हात दिला आहे. स्थानिक चामोर्शी मार्गावरील एस.एम.लॉन येथे निर्माण करण्यात आलेल्या ५० खाटांच्या कोरोना केअर सेंटरमध्ये असोसिएशनने पुन्हा ५० नवीन बेड गादी, चादर व उशीसह उपलब्ध करून दिले आहे. राइस मिल असोशिएशनच्या सहकार्यामुळे स्थानिक प्रशासनाने पुन्हा ५० खाटांचे कोरोना केअर सेंटर चामोर्शी मार्गावर कार्यान्वित केल्याने तालुक्यातील कोरोना बाधितांना आशेचे किरण मिळाले आहे. दरम्यान प्रशासनाने राइस मिल असोसिएशनच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले आहे.