Mann ki Baat | अफवांवर विश्वास ठेऊ नका, लसीकरणाचा लाभ घ्या : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन

103

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात च्या 76 व्या कार्यक्रमात आज देशवासियांना संबोधित केलं. यावेळी देशातील नागरिकांनी कोरोनाच्या लसीसंबंधी कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि देशातील लसीकरणाचा फायदा घ्यावा असं आवाहन केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “कोरोना आपल्या सर्वांची दु:ख सहन करण्याची परीक्षा पाहत आहे अशा वेळी मी आपल्याशी चर्चा करतोय. कोरोनाच्या पहिल्या लाटेशी यशस्वीरित्या सामना केल्यानंतर देशातील नागरिकांचा आत्मविश्वास वाढला होता. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा एकदा देशाला संकटाच्या खाईत लोटलं आहे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, “कोरोना विरोधातली लढाई जिंकण्यासाठी आपल्याला आता तज्ज्ञांच्या आणि वैज्ञानिकांच्या सल्ल्याची गरज आहे. त्याला प्राथमिकता देणं आवश्यक आहे. राज्य सरकारांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे तसेच राज्येही आपली जबाबदारी पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत.”

लसीच्या बाबतीत अफवांना बळी पडू नका
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील लसीकरणाच्या कार्यक्रमावर बोलताना म्हणाले की, “कोरोनाच्या संकट काळात लस ही महत्वाची भूमिका बजावतेय. त्यामुळे माझा आग्रह आहे की कोरोना लसीबद्दल ज्या काही अफवा पसरत आहेत त्यांना बळी पडू नका. 45 वर्षावरील सर्व नागरिकांना लस देण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्यांना मोफत लसीचा पुरवठा करण्यात येणार आहे. एक मेपासून 18 वर्षावरील सर्व व्यक्तींना लस देण्यात येणार आहे. भारत सरकारकडून मोफत लसीकरणाचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. माझी सर्व राज्यांना विनंती आहे की या कार्यक्रमाचा फायदा राज्यांनी घ्यावा आणि आपल्या नागरिकांचे जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण करावे.”