यवतमाळमध्ये लॉकडाऊनमुळे दुकानं बंद, दारूची तहान सॅनिटायझरनं भागवली; 7 जणांचा मृत्यू

151

यवतमाळ, 24 एप्रिल: सध्या राज्यात कोरोना विषाणू (Corona virus) वेगात पसरत आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी लॉकडाऊन (Corona lockdown) आणि कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. परिणामी दारूची दुकानं बंद असल्यानं अनेकांनी दारुला पर्याय म्हणून सॅनिटायझर प्यायला सुरुवात केली आहे. यवतमाळमधून अशीच एक घटना समोर आली आहे. येथील काही लोकांनी गावात दारू मिळत नसल्यानं सॅनिटायझरचं प्राशन (People drinks sanitizer) केलं आहे. त्यामुळे सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

संबंधित घटना यवतमाळ जिल्ह्यातील वणी या शहरातील आहे. वणी शहरात दारूचे सर्व अड्डे पालथे घातल्यानंतरही दारू मिळत नसल्यानं येथील काही लोकांनी दारूची नशा पूर्ण करण्यासाठी सॅनिटायझरचं प्राशन केलं आहे. सॅनिटायझर पिल्यानं एकाच शहरातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना काल रात्री उशीरा घडली आहे.

वणी शहरातील तेली फैल भागात राहणाऱ्या दत्ता लांजेवार आणि नूतन पथरकर यांनी दोघांनी काल दारूची नशा भागवण्यासाठी सॅनिटायझर प्यायलं होतं. त्यानंतर ते दोघंही आपापल्या घरी गेले. पण कालांतराने रात्री उशीरा दोघांच्याही छातीत दुखायला सुरू झालं. त्यांना होणारा त्रास पाहाता नातेवाईकांनी त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच दोघांनी डिस्चार्ज मागून घेतला आणि दोघेही घरी आले. पण मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या छातीत पुन्हा वेदना सुरू झाल्या. दरम्यान काही मिनिटांतच दोघांचाही मृत्यू झाला आहे.वाणी शहरातील दुसऱ्या एका घटनेत एकता नगर येथील रहिवासी असणारे संतोष मेहर, गणेश नांदेकर, सुनील ढेंगले, गणेश शेलार आणि अन्य एका व्यक्तीने सुद्धा दारूऐवजी सॅनिटायझर प्राशन केलं होतं. यांचा सर्वाचा आज सकाळी मृत्यू झाला आहे. या सर्वांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.