एससी, एसटी प्रवर्गातील व्यक्तींचे जीवन होणार प्रकाशमान

37

मूल:- अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांना प्राधान्याने महावितरणद्वारे घरगुती ग्राहकांसाठी वीजजोडणी उपलब्ध करून देण्यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पुढाकार घेतला असून १४ एप्रिल ते ६ डिसेंबर २०२१ या कालावधीत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या निर्देशानुसार या योजनेसंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला.

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शोषितांचे मुक्तिदाते म्हणून सुपरिचित आहेत. शिक्षणाच्या बळावर व दलित, पददलित शोषितांच्या व एकूणच समग्र भारतीयांच्या जीवनात क्रांतीकारक बदल घडवून आणण्याचे काम त्यांनी केले असून एकप्रकारे आधुनिक भारताची पायाभरणी केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगभरात १४ एप्रिल २०२१ रोजी साजरी होत आहे. या जयंतीनिमित्त राज्यातील अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील व्यक्तींचे जीवन प्रकाशमान करण्याच्या दृष्टीने वीज जोडणी कार्यक्रम १४ एप्रिल ते ६ डिसेंबर २०२१ अर्थात बाबासाहेबांची जयंती ते पुण्यतिथी या कालावधीत राबविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय या योजनेत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या असंघटित उद्योगामधील वीज पुरवठ्यासंबंधीच्या तक्रारी, समस्यांचे निवारण करण्याबाबतच्या उपाययोजनांचाही समावेश असेल.

वरील लाभ घेण्यासाठी लाभार्थीकडे सक्षम प्राधिका-याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र,आवश्यक कागदपत्रे असावी,
शासनमान्य विद्युत कंत्राटदारांकडून वीज मांडणीचा चाचणी अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील.
लाभाथ्र्यांने 500 रूपये अनामत रक्कम महावितरणकडे जमा करावी. अर्जदारांचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर वीज नियामक आयोगाच्या तरतुदीच्या आधीन राहुन 15 दिवसात वीज जोडणी उपलब्ध केली जाईल.
अर्जदाराला वीज जोडणीकरीता विद्युत पायाभूत सुविधा उपलब्ध करावी लागणार असल्यास,त्या ठिकाणी महावितणव्दारे
निधी अथवा जिल्हा नियोजन विकास निधी व इतर निधीमधून प्राधान्याने हाती घेऊन पूर्ण करण्यात येईल व वीज जोडणी उपलब्ध करण्यात येईल असे कळविण्यात आले आहे.