पोलीस प्रशासनाने मूल येथील बस स्थानकासमोर वाहतूक शिपाई नियुक्त करावा, अशी मागणी तालुकाध्यक्ष अशोक येरमे यांनी केली आहे.

39

मूल : बसस्थानकासमोरील गर्दीने गजबजलेल्या मार्गावर खाजगी वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांविरुध्द कारवाई करून वाहतूक समस्या सोडवावी, अशी मागणी आदिवासी विकास परिषदेने केली आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पाठविलेल्या निवेदनात आदिवासी विकास परिषदेचे तालुका अध्यक्ष अशोक येरमे यांनी निर्माणाधिन बसस्थानक चंद्रपूर, गडचिरोली, ब्रम्हपुरी, गोंडपिपरी, चिमूर आणि चामोर्शी मार्गाच्या मध्यभागी आहे. त्यामुळे येथील बसस्थानक आणि बसस्थानकासमोरील महामार्ग नेहमी गजबजलेले असते. येथून धावणाऱ्या एस.टी. बसेसच्या फेऱ्या मोठया संख्येने असल्याने दररोज हजारो प्रवासी ये-जा करीत असतात. बस स्थानकासमोरून गेलेल्या चंद्रपूर- गडचिरोली महामार्गाच्या दोन्ही बाजूला उपहारगृह, पानमंदिर असे विविध व्यापारी प्रतिष्ठाने निर्माण झाली असून स्थानकासमोरच ऑटोरिक्षा व चारचाकी वाहनांशिवाय खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहनेसुध्दा उभी असतात. प्रवासी वाहतूक करणारी खासगी वाहने बसस्थानकापासून दोनशे मिटरपेक्षा जास्त अतंरावर उभी ठेवल्या जावेत, असा नियम आहे. परंतु, या नियमाचे उल्लंघन करून खासगी प्रवासी वाहतूक करणारे वाहन ऐन बसस्थानकासमोरच उभे ठेवले जातात. नव्याने निर्माण होत असलेल्या येथील बसस्थानकामध्येे गडचिरोली आणि ब्रम्हपुरीकडून येणाऱ्या एस.टी.बसेसला स्थानकाच्या डाव्या बाजूने आंत जाण्याचा मार्ग आहे, तोच मार्ग स्थानकामधून बाहेर निघणाऱ्या सर्व एस.टी.बसेसकरिता निश्चित करून दिला आहे. स्थानकामधून बाहेर निघण्याच्या ऐन चंद्रपूर मार्गावर उपहारगृह, बेकरी व खानावळ असल्याने या ठिकाणी नेहमी दुचाकी व चारचाकी वाहन उभी ठेवली जातात. सदर मार्गावर नेहमी वाहने उभी ठेवली जात असल्याने बसस्थानकामधून चंद्रपूरकडे जाणाऱ्या एस.टी.बसेसला प्रत्येक वेळेस वळण घेताना त्रास होत आहे.

                       या मार्गावरून बस वळवताना उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे चालकांना कसरत करावी लागत असून प्रसंगी मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. महामार्गावरील वाढत्या गर्दीमुळे आजपर्यंंत अनेक अपघात घडली असून वाहतुकीवर नियंत्रण ठेवणारे वाहतूक शिपाई मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने त्यांच्या कर्तव्याप्रती प्रश्न निर्माण होत आहे. तेव्हा बसस्थानकासमोर होणारी नेहमीची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलीस प्रशासनाने येथील बस स्थानकासमोर वाहतूक शिपाई नियुक्त करावा, अशी मागणी तालुकाध्यक्ष अशोक येरमे यांनी केली आहे.