कवठपेठ-चिरोली मार्गावर डांबरीकरण करण्याची मागणी

33

स्वातंत्र्यपूर्व काळापासून रस्त्याची दुरवस्था

सुशी दाबगाव : मूल तालुक्यातील कवठपेठ ते चीरोली या तीन किलोमीटर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, सदरचा रस्त्याची तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी कवळपेठ गाववासीयांनी केली आहे.

स्वातंत्र्यपूर्व वर्षांपासून या रस्त्याबाबत मागणी होत असताना कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. कवठपेठ ते चिरोली हेटी ही गावे जंगली शिवारालगत असून मार्गावर घनदाट झुडपी जंगल आहे. याच मार्गाला लागून गिट्टी व मुरूम खदानी असून छुपा मार्ग असल्याने अनेक मोठी जड वाहने याच मार्गावरून येजा करतात परिणामी चार किलोमीटर अंतराच्या रस्त्यात प्रचंड खड्डे पडले होते. त्यामुळे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हेही वाहनधारकांना कळेनासे झाले होते. या रस्त्यावरून वाहने चालविताना जीव मुठीत धरून चालवावी लागत होत. याबाबतचे वृत्त वारंवार प्रकाशित केल्यानंतर गिट्टी टाकून रस्त्याचे खडीकरण केले. मात्र अजूनपर्यंत डांबरीकरण न झाल्याने गिट्टी ठिकठिकाणी उखळली आहे. त्यामुळे मार्गक्रमण करताना मोठी कसरत करावी लागत असून वाहन चालविणे अत्यंत धोकादायक ठरत आहे. त्यामुळे या रस्त्याचे तत्काळ डांबरीकरण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.