गुप्तधनामूळे पोटाचा विकार, दुरूस्तीसाठी केली पैश्याची मागणी, पितापुञ खात आहेत तुरूंगाची हवा

33

गुप्तधनामूळे पोटाचा विकार, दुरूस्तीसाठी केली पैश्याची मागणी, पितापुञ खात आहेत तुरूंगाची हवा

  • मूल (प्रतिनिधी)
    सांगीतलेल्या रामबाण उपायाने पोटाचा विकार कमी होत नसेल तर घरात दडवून टेवलेले गुप्तधन काढल्याशिवाय पोटाचा विकार कमी होणार नाही, असे सांगून अडीच लाख रूपयाची मागणी करणा-या एका व्यक्तीस पोलीसांच्या सतर्कतेमूळे तुरूंगाची हवा खावी लागल्याची घटना मूल पोलीस स्टेशन अंतर्गत घडली. चंद्रपूर तालुक्यातील परंतू पोलीस स्टेशन मूल अंतर्गत येणा-या गोंडसावरी येथील रविंद्र यादव पेंदोर हा व्यक्ती मागील कित्येक वर्षापासून पोटाचा विकाराने त्रस्त आहे. अनेक डाॅक्टराकडून उपचार केले परंतू आराम मिळत नाही त्यामूळे गावठी उपचार करून पाहण्याचा सल्ला काही व्यक्तींनी रविंद्रला दिला. काही जणांच्या सल्यानुसार रविंद्र गावठी औषधीच्या शोधार्थ असतांना चंद्रपूर येथील इंदिरा नगर निवासी अजय जोथा पडीयाल आणि सागर अजय पडीयाल या पिता पुत्राशी भेट झाली. या दोघांनी रविंद्रला पोटाचा विकारचं काय तर यापेक्षा अनेक मोठे आजार आम्ही कायमचे नष्ट केले आहे. तुझाही पोटाचा त्रास महिण्याभरात नष्ट करून देतो असे सांगून मधात मिसळून खाण्यासाठी भुकटी औषधी म्हणून दिली. रविंद्रने पडीयाल पितापुत्रावर विश्वास ठेवून मागणी केल्याप्रमाणे 3 हजार रूपयात भुकटी रूपातील औषधी घेतांना पोटाच्या विकारा विषयी माहिती देता आली पाहिजे म्हणून पाच हजार रूपये किंमतीचा एक मोबाईल घेवून दिला. पडीयाल पितापुत्राच्या सांगण्याप्रमाणे नियमित औषधी घेतली परंतू पोटाचा विकार कमी झालाच नाही, म्हणून रविंद्रने पडीयाल पितापुत्राला विचारणा केली, तेव्हा पडीयाल पितापुत्रानी आमच्या औषधीने पोटाचा विकार कमी व्हायलाच पाहीजे, कमी होत नसेल तर नक्कीच काहीतरी समस्या आहे, असे सांगून आम्हाला आपल्या घरी यावं लागेल. असे सांगून गोंडसावरी येथे येण्यासाठी दिवस निश्चित केला. निश्चित केलेल्या दिवशी पडीयाल पिता पुत्र गोंडसावरी येथे रविंद्र पेदोर याचे घरी पोहोचले. घराची पाहणी केल्यानंतर रविंद्र याला घरात कोठेतरी पुर्वजांनी सोनेचांदी दडवून ठेवले आहे. दडवून ठेवलेल्या या गुप्तधनामूळे घरात सुख समाधान नसून आपल्याला पोटाचा विकार जळला आहे. जो पर्यंत घरात दडवून ठेवलेला गुप्तधन बाहेर काढणार नाही,तो पर्यंत पोटाचा विकार कमी होवून घरात सुख समाधान नांदणार नाही, असे सांगून गुप्तधन काढण्याचा सल्ला दिला. रविंद्र पेंदोर याला पडीयाल पितापुत्राच्या म्हणण्यावर विश्वास वाटल्याने त्याने गुप्तधन काढून देण्याची पडीयाल पितापुत्राला विनंती केली. त्यानुसार पडीयाल पिता पुत्रानी दिवस निश्चित करून त्याकरीता अडीच लाख रूपये खर्च लागेल त्यापैकी 50 हजार रूपये नगदी देण्याचा आग्रह धरला. गुप्तधन काढण्याचे आश्वासन, त्याकरीता अडीच लाख रूपयाचा खर्च पैकी 50 हजार रूपयाची नगदी मागणी, हा सर्व प्रकार रविंद्रला शंकास्पद वाटला. म्हणून त्याने सदरची माहिती पोलीस पाटील यांचे मार्फतीने मूल पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतिशसिंह राजपुत यांचे पर्यंत पोहोचविली. मिळालेली माहिती बनवाबनवी ची असल्याची खात्री झाल्याने ठाणेदार सतिशसिंह राजपुत यांनी रविंद्र याचे घरी सापळा रचला. रविंद्र याने रक्कम देण्याचे मान्य करून पडीयाल पिता पुत्राला घरी बोलावणं केल. त्याक्षणी सापळा रचून बसलेल्या मूल पोलीसांनी रविंद्र याचे घर गाठून पडीयाल पितापुत्राला विचारणा करताच दोघांचीही भांबेरी उडाली आणि हा सर्व प्रकार थोथांड असल्याचे मान्य करून पोलीसांना शरण आले. दरम्यान रोग कमी करण्याचे आमिष दाखवून लाखो रूपयाची मागणी करणारे वडील अजय पडीयाल आणि पुत्र सागर पडीयाल यांचे विरूध्द मूल पोलीसांनी कायदेशीर कारवाई केल्याने सध्या पडीयाल पिता पुत्र चंद्रपूरच्या कारागृहात हवा खात आहेत. प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस अधिक्षक अनुज तारे यांचे मार्गदर्शनात ठाणेदार सतिशसिंह राजपुत आणि पोलीस उपनिरीक्षिक पुरूषोत्तम राठोड सहका-यांच्या मदतीने करीत आहेत.