मूल तालुक्यातील पिपरी दिक्षीत या गावातील सुशिक्षित नीरजचे यश प्रेरणादायी पदवीधर शेतमजूर झाला देशसेवेसाठी सज्ज

32

नीरजचे यश प्रेरणादायी पदवीधर शेतमजूर झाला देशसेवेसाठी सज्ज

नीरज हा मूल तालुक्यातील पिपरी दिक्षीत या गावातील सुशिक्षित पण बेरोजगार युवक

मूल : जिद्द, चिकाटी, परीश्रम, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन असला तर यशाची पायरी सहज गाठता येते. याची प्रचिती निरज ढोंगे या युवकाने करून दिली असून हताश न होता जिद्दीने परीश्रम करा, फळ नक्कीच पदरात पडेल, असा विश्वास युवापिढीला दिला आहे. अत्यंत हलाखीच्या कौटुंबिक परिस्थितीवर मात करून निरज ढोंगे याने परीश्रमाच्या जोरावर केंद्रीय राखीव पोलीस दलात स्थान मिळविले आहे.

नीरज हा मूल तालुक्यातील पिपरी दिक्षीत या गावातील सुशिक्षित पण बेरोजगार युवक. कुटूंबाकडे जेमतेम दोन एकर शेती. कुटूंबियावर शिक्षणासाठी काढलेला कर्जाचा डोंगर, थोरला मुलगा आर्मीत लागल्याने कुटूंबाला मदतीचे किरण दिसत असतानाच वडिलांचे अकाली निधन झाले. अशा स्थितीत नीरज मनोहर ढोंगेने जिद्दीने मिळवलेले यश प्रेरणादायी आहे. नीरजचे प्राथमिक शिक्षण गावीच झाले. मूल येथील कर्मवीर महाविद्यालयातून इयत्ता बारावी उत्तीर्ण झाला. हातावर आणून पानावर खाणे अशी कौटुंबिक परिस्थिती असल्याने पुढील शिक्षण शेती व रोजंदारीवर परीश्रम करून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठातून पूर्ण करीत पदवी प्राप्त केली. मोठा भाऊ सूरज ढोंगे इंडियन आर्मीत दाखल झाल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. कुटुंबात आई-वडीलाशिवाय सूरज आणि नीरज हे दोन भाऊ होते. दरम्यान थोरला भाऊ सूरज आर्मीत लागल्यामुळे कुटूंबियाना आशेने किरण दिसू लागले. दरम्यान २०१९ मध्ये वडील मनोहर यांचे अपघाती निधन झाले. वडीलांच्या अकाली निधनाने कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. अशा परिस्थितीतही नीरजने मिळविलेले यश परिसरातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.