व्यावसायीकांनी कोरोना तपासणी करावी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे आवाहन

32
व्यावसायीकांनी कोरोना तपासणी करावी
जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे आवाहन
चंद्रपूर दि.13 मार्च : दैनंदिन व्यवसायाच्या निमित्ताने दररोजच विविध नागरिकांच्या संपर्कात येणाऱ्या व्यावसायीकांनी तातडीने त्यांची आरटीपीसीआर कोरोना तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.
चंद्रपूर चेंबर ऑफ कॉमर्स, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांचेसमवेत काल नियोजन भवन सभागृहात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व मुख्य कार्यकारी अधिकरी राहुल कर्डिले यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनबाबत चर्चा केली.
जिल्हाधिकारी गुल्हाने यावेळी म्हणाले की बहुतांश व्यावसायीक सुपरस्प्रेडर गटात मोडतात, त्यामुळे त्यांनी स्वत:ची काळजी घ्यावी, तसेच इतरांचीही काळजी घ्यावी. तपासणीमुळे कोरोना आजाराचे लवकर निदान झाल्यास संभाव्य धोका टाळता येईल, तसेच कोरोनाचा फैलावदेखील रोखता येईल, त्यामुळे व्यावसायानिमित्त बाहेर राहणाऱ्या लोकांनी कोरोनाची तपासणी तातडीने करून घ्यावी असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी कोरोना विरुद्धच्या लढ्यात जिल्हा प्रशासन व व्यापारी असोशियन चंद्रपूर संस्थेतील सर्वांचे सहभाग आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी व्यक्त केले
कोव्हीड-19 च्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता आपआपल्या व्यवसायातील सर्व सहकारी, कर्मचारी, कामगार यांची कोविड तपासणी करुन घेणे, कोविड रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची माहिती देणे त्यासोबतच मास्कचा वापर, सामाजिक अंतर राखणे, वारंवार हात धुणे, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळणे, लग्न व इतर सामुहिक समारंभाच्या ठिकाणी नियंत्रित संख्या ठेवणे, कोरोनासंदर्भातील लक्षणे आढळताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आदीबाबत उद्योगातील आस्थापनांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना उद्युक्त करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी 45 वर्षावरील व्याधीग्रस्त व 60 वर्षावरील व्यावसायीकांनी कोरोना लसीकरण करून स्वत:ला सुरक्षीत करून घेण्याचे आवाहन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाळ, महानगरपालीकेचे वैद्यकीय अधिकारी अविष्कार खंडारे, चंद्रपूर चेंबर ऑफ कामर्सचे अध्यक्ष हर्षवर्धन सिंघवी, उपाध्यक्ष सदानंद खत्री, रामजीवन परमार, सुमेध कोतपल्लीवार, प्रभाकर मंत्री, नारायण तोशनीवाल, दिनेश बजाज, श्री. आवळे, श्री. टहिल्याणी, एमआयडीसीचे मधुसूदन रुंगठा, प्रविण जाणी यांचेसमवेत विविध व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.