मूलच्या नागमंदिरात माजी मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतले दर्शन

40

मूल : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर गुरुवारी प्रथमच मूलमध्ये आले होते. त्यांच्यासोबत माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे हेसुद्धा आले होते. मूलमध्ये आल्यानंतर तलावाच्या शेजारी असलेल्या नागमंदिरात त्यांनी दर्शन घेतले.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मूल हे मूळ गाव असून, मुख्यमंत्री असतानाही दोनदा या ठिकाणी ते आले होते. दरम्यान, गुरुवारी अचानक मूलमध्ये त्यांचे आगमण झाल्यानंतर माजीमंत्री शोभा फडणवीस यांच्या घरी त्यांनी बंदद्वार चर्चा केली. ही चर्चा कशा संदर्भात होती, याचा तपशील बाहेर आला नसला तरी एका जागेसंदर्भात ते मूलमध्ये आले असल्याची चर्चा आहे. ज्या मंदिरात विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी दर्शन घेतले, ती जागा त्यांच्या कुटुंबीयांनी दान केली होती. त्याच ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी मूलमध्ये दाखल होत दर्शन घेतले असले तरी एका महत्त्वपूर्ण खासगी कामानिमित्त ते आले असल्याची चर्चा आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरुनुले यांनी मूलमध्ये पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी विकासकामांवर चर्चा करून पक्षकामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी फिस्कुटी येथे सुसज्ज सभागृहाची मागणी त्यांच्याकडे करण्यात आली. याप्रसंगी माजी आमदार शोभा फडणवीस, प्रशांत समर्थ, सरपंच नितीन गुरनुले उपस्थित होते.