खासगी डॉक्टर कोरोना लसीकरणापासून वंचित

49

खासगी डॉक्टर कोरोना लसीकरणापासून वंचित     लसीकरणाची मागणी

मूल : रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रिद डोळ्यासमोर ठेवून कोरोना काळात विविध प्रकारच्या आजारासंबंधी नागरिकांची सुश्रृषा करणाऱ्या स्थानिक खाजगी डॉक्टर व पॅथालॉजी धारकांना कोरोना लसीकरणाचा लाभ न मिळाल्याने स्थानिक खासगी डॉक्टरांमध्ये नाराजीचा सूर आहे. आरोग्य सेवा पुरविणाऱ्या तालुक्यातील खासगी डॉक्टरांना कोरोना लसीकरणाचा डोस दिला जावा, अशी मागणी केली जात आहे. मेडिकल प्रॅक्टीशन असोसिएशन मूलच्या वतीने उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांना या मागणीचे निवेदन दिले आहे.

कोरोना आणीबाणीच्या काळात जीवाची तमा न बाळगता प्रशासनाला सेवा पुरवून सहकार्य करणाऱ्या प्रशासनातील महत्त्वाच्या घटकांचे आरोग्य भविष्यात सुदृढ राहावे म्हणून प्रशासनाच्या वतीने संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोविड १९ लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला. लसीकरणाच्या डोसचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, नुकताच दुसरा टप्पा सुरू झाला आहे. असे असताना मूल शहर आणि तालुक्याच्या विविध भागात जनतेला आरोग्याची सेवा पुरविणाऱ्या डॉक्टर, तेथील कर्मचारी आणि पॅथालॉजी धारकांना लसीकरणाचा पहिला डोस मिळाला नाही. कोरोना काळात शासकिय डॉक्टरांसोबतच खाजगी डॉक्टरांनीसुध्दा नागरिकांना आरोग्याची सेवा पुरविली असल्याने कोरोनाच्या प्रसाराला आळा बसला आहे. ही वास्तविकता असल्याने प्रशासनाने खाजगी डॉक्टरांना लसीकरणाचा लाभ मिळावा म्हणून माहिती मागविली होती. त्यानुसार खासगी डॉक्टरांनी संबंधित विभागाकडे आयडी क्रमांकासह संपूर्ण माहिती दिली आहे. त्यामुळे लसीकरणाचा पहिला डोस नाही तर किमान दुसरा डोसचा तरी लाभ मिळावा अशी खासगी डॉक्टरांची अपेक्षा आहे. परंतु लसीकरणा संबंधी आरोग्य विभागाकडून आजपर्यंत कोणतीही सूचना मिळालेली नाही. कोरोनासदृश्य काळात नागरिकांना आरोग्याची सेवा पुरवित असताना आरोग्य विभाग खाजगी डॉक्टरांना डावलत असून प्रशासनाच्या इतर विभागातील अधिकाऱ्यांपासून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना मात्र लसीकरणाचा पहिल्या व दुसऱ्या डोसचा लाभ दिल्या जात आहे. ही बाब खेदजनक असून नागरिकांना थेट आरोग्य सेवा पुरविणाऱ्या खासगी डॉक्टरांना जर प्रशासन लसीकरणाचा लाभ देत नसेल तर पुढील काळात प्रशासनाला आरोग्याच्या बाबतीत सहकार्य करावे कसे, असा प्रश्न खासगी डॉक्टरांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याची सेवा पुरविणाऱ्या खाजगी डॉक्टरांना प्रशासनाने कोरोना लसीकरणाचा डोसचा लाभ देण्यांत यावा, अशी विनंतीवजा मागणी मेडिकल प्रॅक्टीशनर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुभाष बुक्कावार, सचिव डॉ. विनोद चौधरी, कोषाध्यक्ष डॉ. मार्टीन अझीम, सदस्य डॉ. आशिष कुलकर्णी, डॉ. दिनेश वऱ्हाडे आदिंनी निवेदनाद्वारे केली आहे.