कृषि योजनांसाठी प्रथमच ऑनलाइन सोडत

43

मुंबई, – शेतकऱ्यांनी केलेल्या एकाच अर्जावर कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ देणाऱ्या महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून नुकतीच प्रथमच ऑनलाइन सोडत काढण्यात आली. त्याद्वारे राज्यातील 2 लाख शेतकऱ्यांची पारदर्शकपणे निवड करण्यात आली आहे. यांत्रिकीकरण, सूक्ष्मसिंचन, विशेष घटक योजना, नविन विहीरी व फलोत्पादनाच्या विविध बाबींसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

नव्याने विकसित केलेल्या या प्रणालीस राज्यातील शेतकऱ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. 11 लाख 34 हजार शेतकऱ्यांनी या प्रणालीवर नोंदणी करुन विविध योजनांतर्गत मागणी नोंदवली. प्रत्येक योजनेच्या आर्थिक लक्षांकानुसार राज्यातील 2 लाख शेतकऱ्यांची ऑनलाईन सोडतीद्वारे निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने यांत्रिकीकरण, सिंचनाच्या विविध बाबी, फलोत्पादन, नवीन विहीरी बांधणे आदी विविध बाबींसाठी लाभार्थ्यांची निवड झाली आहे.

निवड झालेल्या शेतकऱ्यांना महाडीबीटी प्रणालीवर लॉग इन करुन त्यांच्या निवडीबाबतची माहिती मिळू शकते तसेच या शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर निवडीबाबत संदेशही प्राप्त होतील. जे शेतकरी निवडीनंतर मुदतीत घटकांची अंमलबजावणी करणार नाहीत त्यांची निवड रद्द करुन संगणकीयप्रणालीद्वारे प्रतिक्षा यादीतील क्रमवारीनुसार पुढील शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.