क्षयरुग्णांची नोंदणी करणे अनिवार्य

39
क्षयरुग्णांची नोंदणी करणे अनिवार्य
चंद्रपूर, दि. 10 फेब्रुवारी : जिल्ह्यातील खाजगी वैद्यकीय क्षेत्राकडुन निदान होणाऱ्या, उपचार घेणाऱ्या व औषधी घेणाऱ्या सर्व क्षयरुग्णांची माहिती शासन निर्देशाप्रमाणे जिल्हा क्षयरोग कार्यालयास दरमहा कळविण्यातबाबत जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी संबंधीतांना कळविले आहे.
आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाच्या 16 मार्च 2018 च्या अधिसुचनेनुसार प्रत्येक क्षयरुग्णांची नोंद होऊन त्याला उपचार करणे व क्षयरोगाचा प्रसार रोखणे, नियमित उपचारास प्रतिसाद न देणाऱ्या क्षयरोगाच्या वाढत्या प्रसारास आळा घालण्यासाठी उपाययोजना करणे हा नोंदणीचा उद्देश आहे.
नोंदणी करणे अनिवार्य असलेल्या खाजगी क्षेत्रातील वैद्यकीय संस्था : क्षयरोग निदान करणाऱ्या जिल्ह्यातील सर्व पॅथोलॉजी, मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळा, रेडीओलॉजी सुविधा, क्षयरुग्णांवर उपचार करणारे विविध पॅथींची सर्व रुग्णालये, बाह्य रुग्ण व अंतर रुग्ण सुविधा देणरे सर्व डॉक्टर्स, क्षयरोगाची औषधे विकणारे सर्व औषध विक्रेते.
कायदेशीर तरतुदी : ज्या प्रयोगशाळा, डॉक्टर, रुग्णालये व औषध विक्रेते रुग्णांची नोंदणी करणार नाहीत, अशा संस्था, व्यक्ति क्षयरोगाचा प्रसार करण्यासाठी जबाबदार धरण्यास येवून, भारतीय दंड विधान कलम २६९, २७० नुसार कारवाईसाठी पात्र आहेत. या कलमा अंतर्गत दोषी ठरलेल्या व्यक्तिस किमान 6 महिने ते 2 वर्षापर्यंत शिक्षा व दंडाची तरतुद आहे.
तरी जिल्ह्यातील क्षयरोग निदान करणाऱ्या सर्व प्रयोगशाळा, क्षयरुग्णांवर उपचार करणारे विविध पॅथीची सर्व रुग्णालये, डॉक्टर्स, क्षयरोगाची औषध विकणारे सर्व औषध विक्रेते यांना दि. 1 जानेवारी 2021 पासुन आपल्याकडील सर्व रुग्णांची नोंदणी करून सदर माहिती दरमाह क्षयरोग कार्यालयास उपलब्ध करून देण्यात यावी, असे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. साठे यांनी कळविले आहे.