आधारशी संबंधित तब्बल 35 सेवा आता थेट स्मार्टफोनवर, घरबसल्या करता येणार मोठी कामं

47

नवी दिल्ली – स्मार्टफोन हा अत्यंत उपयोगाचा असून त्याच्या मदतीने अनेक गोष्टी या अत्यंत सोप्या पद्धतीने आणि सहज रित्या करता येतात. विशेषत: आता आधारशी संबंधित अनेक कामं घरबसल्या करता येऊ शकतात. त्यात ई आधार डाऊनलोड करणं, त्याचं स्टेटस अपडेट करणं किंवा आधार केंद्राचा पत्ता शोधणं अशा अनेक कामांच्या समावेश असून स्मार्टफोनच्या मदतीने हे अत्यंत कमी वेळेत करता येतं. आधारशी संबंधित जवळपास 35 योजना आहेत ज्या स्मार्टफोनच्या मदतीने सहज प्राप्त करता येणार आहेत.

यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI)ने एम-आधार (mAadhar) मोबाईल App जारी केलं आहे. हे App तुम्ही तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन अनेक सुविधांचा लाभ घेऊ शकता. आज जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्टफोन आहे. अशावेळी हे mAadhar मोबाईल App डाऊनलोड करुन आधारशी संबंधित अनेक सुविधांचा लाभ तुम्ही घरबसल्या मिळवू शकता. या Appचा अजून एक फायदा म्हणजे आधारची एक सॉफ्ट कॉपी कायमस्वरुपी आपल्या जवळ असणार आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या आधारची हार्ड कॉपी कायम सोबत ठेवण्याची गरज भासणार नाही.

12 भाषांमध्ये मोबाईल App

Appचा वापर करताना भाषेसाठी कोणतीही अडचण येणार नाही. कारण देशातील 12 वेगवेगळ्या भाषांमध्ये हे App उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. त्यामध्ये इंग्रजी भाषेचा समावेश तर आहे. सोबतच हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, तामिळ, तेलगू, आणि उर्दू भाषांचा समावेश आहे. हे App डॉऊनलोड केल्यानंतर यूजरला त्यांच्या भाषेबद्दल विचारलं जाईल आणि त्यानंतर त्या भाषेत ते संपूर्ण काम केलं जाणार आहे.

लॉक-अनलॉकची सुविधा मिळणार

mAadhar या App द्वारे तुम्ही आधार कॉपी डाऊनलोड करणं, री-प्रिंटसाठी ऑर्डर करणं, ऑफलाईन ई केवायसी डाऊनलोड, क्यूआर कोड दाखवणं किंवा स्कॅन करणं, आधारचं व्हेरिफिकेशन, मेल किंवा ईमेलचं व्हेरिफिकेशन, यूआयडी किंवा ईआयडी मिळवणं आणि एड्रेस व्हॅलिडेशन लेटरसाठी रिक्वेस्ट पाठवण्यासारख्या अनेक कामांचा त्यात समावेश आहे. आधारशी निगडीत ऑनलाईन रिक्वेस्टही या माध्यमातून तपासू शकता. यामध्ये लॉक-अनलॉकची सुविधा मिळणार आहे. तसेच क्यूआर कोड स्कॅन करण्यासाठीही मदत होणार आहे.