रोज 1 रुपया वाचवून सुरक्षित करा तुमच्या मुलीचं भविष्य, वाचा काय आहेत या सरकारी योजनेचे फायदे

52

नवी दिल्ली, 07 फेब्रुवारी: तुमची देखील मुलगी आहे आणि तुम्ही तिचे भविष्य सुरक्षित करू इच्छित असाल तर ही सरकार योजना तुमच्या फायद्याची आहे. यामध्ये तुम्हाला बचतही छोटी करावी लागेल आणि सरकारी गॅरंटी देखील मिळते आहे. केंद्राकडून चालवण्यात येणाऱ्या या योजनेमध्ये मुलीच्या शिक्षणासाठी-लग्नासाठी एकरकमी पैसे मिळतात. तुम्ही दररोज केवळ 1 रुपया वाचवून यासाठी बचत करू शकता. उच्च शिक्षण किंवा लग्नासाठी आर्थिक मदत लागल्यास ही योजवा बेस्ट आहे. सरकारकडून देण्यात येणाऱ्या या योजनेचं नाव आहे सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana). यामध्ये तुम्हाला इनकम टॅक्समध्ये देखील सवलत मिळेल. जाणून घ्या केंद्र सरकारच्या या योजनेबद्दल

काय आहे सुकन्या समृद्धी योजना?

ही योजना (SSY)मुलींसाठी सुरू करण्यात आलेली केंद्र सरकारची योजना आहे. ही योजना बेटी बचाओ बेटी पढाओ या स्कीमअंतर्गत लाँच करण्यात आली आहे. छोट्या बचत योजनांमध्ये सुकन्या समृद्धी योजना एक चांगला व्याजदर असणारी योजना आहे.

एवढी करू शकता गुंतवणूक

या योजनेमध्ये कमीतकमी डिपॉझिट 250 रुपये आहे. अर्थात तुम्ही रोज एक रुपया जरी वाचवला तरी यामध्ये गुंतवणूक करू शकता. एका आर्थिक वर्षात कमीत कमी 250 रुपये तुम्हाला भरावे लागतील. तर जास्तीत जास्त डिपॉझिट 150000 रुपये आहे.

किती मिळेल व्याज?

Sukanya Samriddhi Account मध्ये तुम्हाला 7.6 टक्के व्याज मिळते आहे. या योजनेत मिळणाऱ्या व्याजावर कर सवलत देण्यात येते. याआधी या योजनेमध्ये 9.2 टक्के व्याज मिळत होते. मुलीचं वय 8 वर्षे झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी या योजनेतून 50 टक्के रक्कम काढता येईल.

कुठे आणि कसे उघडाल खाते?

या योजनेत खाते उघडण्यासाठी अर्जदाराला फॉर्मबरोबर पोस्ट ऑफिसमध्ये किंवा बँकेत मुलीचा जन्म दाखला जमा करावा लागेल. याशिवाय मुलीचे आणि आईवडिलांचे ओळखपत्र (पॅन कार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट) तसंच अॅड्रेस प्रुफ (पासपोर्ट, रेशन कार्ड, वीजबिल, टेलिफोन बिल, पाणीपट्टी) द्यावे लागेल. या योजनेअंतर्गत मुलीचा जन्म झाल्यापासून ते ती 10 वर्षांची होईपर्यंत कमीत कमी 250 रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख भरून हे खाते उघडता येईल.

कधी पर्यंत सुरू ठेवता येईल खाते?

SSY खाते सुरू केल्यानंतर मुलीचे वय 21 वर्षे होईपर्यंत किंवा 18 व्या वर्षानंतर तिचे लग्न होईपर्यंत चालवता येईल. तुम्ही मुलीचे कायदेशीर पालक असल्यासच तुम्ही हे खाते उघडू शकता. एका मुलीच्या नावे तुम्ही एकच खाते उघडू शकता. एकूण दोन मुलींच्या नावावर तुम्ही हे खाते उघडू शकता. मात्र जर दुसऱ्या मुलीच्या जन्मावेळी तुम्हाला जुळ्या मुली झाल्या तर तुम्ही तीन खाती उघडू शकता.