राज्यातील महाविद्यालये ‘या’ तारखेपासून उघडणार

43

मुंबई – राज्यातील शाळांपाठोपाठ आता महाविद्यालयेही सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या 50 टक्के उपस्थितीने सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच करोना संकट पाहता विद्यार्थ्यांना तूर्तास 75 टक्के सक्तीच्या उपस्थितीची अट बंधनकारक नसणार आहे, असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

उदय सामंत म्हणाले, महाविद्यालय सुरु करत असताना एक महत्त्वाची भूमिका विद्यापीठांची किंवा खासगी विद्यापीठांची असली पाहिजे. यूजीसीने म्हटले आहे की, विद्यार्थ्यांच्या वर्गांची संख्या, त्यामध्ये किती विद्यार्थी बसण्याची व्यवस्था आहे. त्या बसण्याच्या व्यवस्थेच्या 50 टक्के रोटेशन पद्धतीने विद्यार्थ्यांच्या संख्येसह महाविद्यालय सुरु करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने परवानगी दिली आहे. म्हणजेच, 50 टक्के उपस्थितीसह महाविद्यालयं सुरु केली जातील.

महाविद्यालय सुरु करण्यासाठी युजीसीनेही काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, संबंधित यंत्रणा, जिल्हाधिकारी यांना पायाभूत सुविधांची माहिती दिली पाहिजे. आपल्या जिल्ह्यातील करोनाची पार्श्‍वभूमी पाहून हा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाहिजे. त्यानंतर 50 टक्के उपस्थितीसह महाविद्यालये सुरु करण्यात यावी. ही महाविद्यालये 15 फेब्रवारीपासून सुरू करू शकतात, असे त्यांनी सांगितले.

महाविद्यालय सुरु होत असताना वसतीगृहांचा जो प्रश्न आहे. तो टप्प्याटप्प्याने सुरु करण्याचा अधिकार विद्यापीठांकडे सोपविण्यात आला आहे. पण सध्या 15 फेब्रुवारी रोजी फक्त कॉलेज सुरु होतील, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन किंवा ऑफलाइन, म्हणजेच विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार घेण्यात याव्यात, अशी चर्चा विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या बैठकीत झाली. त्यामुळे हा निर्णयही विद्यापीठाने घ्यावा. तसेच विद्यार्थ्यांना दोन्ही पर्याय खुले ठेवावेत, अशी परवानगी महाराष्ट्र शासनाने दिली आहे.

तसेच प्रवेश, शिक्षण पद्धती, अभ्यासक्रम पूर्ण करणे, परीक्षा, मूल्यमापन, निकाल जाहीर करणे याबाबत जी अनिश्‍चितता वाटते. त्या संदर्भात देखील विद्यापीठांनी तातडीने विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या मनातील शंका दूर कराव्यात, असे यूजीसीचे म्हणणे असल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले.