कर्जाचा सदुपयोग करून प्रगती करा – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

33
कर्जाचा सदुपयोग करून प्रगती करा – पालकमंत्री विजय वडेट्टीवार
चंद्रपूर, दि. 25 : कोणत्याही बँका सहज कर्ज देत नाही मात्र जिल्हा मध्यवर्ती बँकेने आपल्याला केवळ दोन व्यक्तींच्या हमीपत्रावर तब्बल 50 हजार रुपयांचे कर्ज दिले आहे. या रकमेत छोटा व्यवसाय चांगल्याने करता येतो, तरी या कर्जाचा सदुपयोग करून आपल्या व्यवसायात प्रगती साधा, अशा सूचना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज केल्या.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने स्व. राजीव गांधी स्वावलंबन कर्ज योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 142 छोट्या व्यावसायीकांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. या कर्जाचे धनादेश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे हस्ते देण्याचा कार्यक्रम आज बँकेत आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आमदार सुभाष धोटे, आ. किशोर जोरगेवार, आ. प्रतिभा धानोरकर, बँकेचे अध्यक्ष संतोष रावत, उपाध्यक्ष यशवंत दिघोरे प्रामुख्याने उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले की महिला बचतीचा मार्ग चोखंदळपणे निवडतात, त्यामुळे बँकांनी देखील कर्जाची रकम देतांना ती कर्जदारांच्या कुटूंबातील महिलेच्या खात्यात जमा करावी.यावेळी पालकमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कर्जाचे धनादेश संबंधीतांना देण्यात आले.
कार्यक्रमाला बँकेचे संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी तसेच बँकेच ग्राहक उपस्थित होते.